महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कोपरखैरणे येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू
नवी मुंबई : कोपरखैरणे नोड मधील बोनकोडे गावातील चार मजली इमारत शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका व्यक्तीचा मृत्यू, तर इमारतीच्या बाजूने जाणारा एक व्यक्ती जखमी झाला आहे. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. शनिवारी रात्रभर व रविवारी सुध्दा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.
15 वर्षे जुन्याअसलेल्या या इमारतीत ३४ कुटुंब राहत होती. सदर इमारत धोकादायक झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी दिवसा ही इमारत रिकामी करण्यात आली होती. मात्र शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास जीर्ण झालेली साईप्रसाद हि निवासी इमारत अखेर कोसळली. या इमारतीत त्यावेळी प्रियावर्त सर्वेश्वर दत्त (31) हा त्या इमारतीत गेला होता. त्यामुळे तो सदर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबला जाऊन त्याचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव पथक व दोन अग्निशमन गाड्यासह घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. यादरम्यान सकाळच्या सुमारास प्रियावर्त सर्वेश्वर दत्त हा सदर ढिगाऱ्याखाली मृतावस्थेत सापडला.
इमारत कोसळली, त्यावेळी इमारतीच्या बाजूने जाणारा एक व्यक्ती देखील या दुर्घटनेत जखमी झाला असून त्याच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारत जुन्या गावठाण भागातील असून सदर इमारत नारायण म्हात्रे यांच्या जमिनीवर नारायण म्हात्रे व गणपत चव्हाण या दोघांनी मिळून बांधलेली होती. सदर इमारत अंदाजे पंधरा वर्षांपूर्वी बांधलेली होती, तसेच सदर इमारतीच्या बांधकामाबाबत कोणतीही तक्रार महापालिकेस प्राप्त नव्हती,असेही महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर इमारतीतील सभासदांना महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून त्यांची महापालिकेकडून रात्रीच्या जेवणाची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच रविवारी देखील सदर कुटुंबांना नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली .