कांदळवनाच्या झाडाची कत्तल

उरणमध्ये 20 एकर जागेमध्ये डेब्रीजचा भराव 

नवी मुंबई  : उरणमधील काही व्यक्तींनी धुतूम गावालगतच्या जागेमध्ये डेब्रीजचा भराव करुन तेथील कांदळवनाच्या झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच सदर जागेवर ट्रक-ट्रेलर पार्किंग सुरू करून सुमारे 20 एकर जागा बळकावल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिसांनी या प्रकरणातील 8 व्यक्ती विरोधात कांदळवन झाडांचा-हास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

उरण तालुक्यात झिया यार्डच्या जवळ धुतुम येथे काही व्यक्तींनी 20 एकर जागेतील कांदळवनाचा नाश करुन त्यावर ट्रक ट्रेलर पार्किंग सुरू केल्याची माहिती उरणच्या तहसिलदाराना मिळाली होती. त्यामुळे तहसीलदारांनी सदर ठिकाणी सयुंक्त स्थळपाहणी करुन वस्तुस्थितीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जासई येथील तलाठी व वन विभागाच्या पथकाने नुकतीच संयुक्त स्थळ पाहणी केली. यावेळी मौजे धुतुम येथील झिया कंटेनर यार्डच्या बाजूला मौजे वालटीखार येथील सर्व्हे नंबर 17 व 19 या जमिनीमध्ये काही व्यक्तींनी ट्रक/ ट्रेलर पार्किंगसाठी सदर जमिनीचा ताबा घेतल्याचे व सदर जागेमध्ये डेब्रीजचा भराव करुन सदर जागेचा वापर चालु केल्याचे आढळुन आले. 

तसेच धूतूम गावातील अमित ठाकुर, अलंकार ठाकुर, अरुण ठाकुर, पराग ठाकुर, संदेश ठाकुर, शेखर ठाकुर, तुकाराम ठाकुर व आशिष ठाकुर या सर्वांनी अंदाजे 20 एकर जागेमध्ये सहा महिन्यापुर्वी डेब्रीजचा भराव करून कांदळवनाच्या झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे आढळून आले. त्यानुसार तलाठी यांनी तहसीलदारांच्या आदेशानुसार 20 एकर जमीनीवर ट्रक/ट्रेलर पार्किंगसाठी डेब्रीजचा भराव करुन कांदळवनाचा नाश करणाऱ्या व्यक्ती विरोधात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कांदळवन झाडांचा -हास केल्याप्रकरणी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 कलम 15, 19 अन्वये गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरखैरणे येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू