महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पनवेल मधील पोयंजे गावातील 80 वर्षीय वृद्धाची हत्या
नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील पोयंजे गावात राहणाऱ्या पाडुरंग मऱ्या मते या 80 वर्षीय वृद्धावर अज्ञात मारेकऱ्यांने धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पांडुरंग मते यांचा मृतदेह गत 26 सप्टेंबर रोजी वालीचा डोह या ओढयांमध्ये सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील मृत पांडुरंग मते यांची मुले,सूना व नातवंडे हे पनवेल तालुक्यातील पोयंजे गावात राहत आहेत, तर पांडुरंग मते हे गावाबाहेरील घरात एकटेच राहत होते. गत 26 सप्टेंबर रोजी सकाळी पांडुरंग मते यांचा मृतदेह पोयंजे गावालगतच्या वालीचा डोह या ओढयांमध्ये आढळुन आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मते यांचा मृतदेह ताब्यात घेतला.यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत पांडुरंग मते यांच्या कपाळावर, डाव्या डोळयाच्या खाली व उजव्या डोळयाच्या भुवईवर त्याचप्रमाणे त्यांच्या डोक्याच्या पाठीमागे डाव्या बाजुला 2 खोल जखमा असल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलीसांनी सदर परिसराची बारकाईने पाहणी केली असता, ओढयापासुन सुमारे 70 फुट अंतरावर असलेल्या पाडुरंग मते राहत असलेल्या घराच्या गेटवर व जमीनीवर रक्त पडल्याचे निदर्शनास आले. यावरून पाडुंरंग मते यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या केल्याचे तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह वालीच्या डोहामध्ये टाकुन दिल्याचे आढळुन आले. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यां विरोधात हत्या व पुरावा नष्ट करणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.