19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकिस

तरुणीचा विनयभंग करणारा स्विगी डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल

नवी मुंबई :पनवेलमधील कोन गाव येथील एका गृहनिर्माण सोसायटीत जेवणाची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या स्विगी डिलिव्हरी बॉयने जेवण घेण्यासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकिस आली आहे. मोहम्मद रिजवान शाह (२७) असे या स्विगी डिलिव्हरी बॉयचे नाव असून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे.

या घटनेतील १९ वर्षीय तरुणी पदवीच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असून ती इतर तीन कॉलेज मैत्रिणीसोबत पनवेलमधील कोन गाव येथील एका गृहनिर्माण सोसायटीत राहण्यास आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास या तरुणींनी स्वीगी वरून जेवणाची ऑर्डर दिली होती. या तरुणींचे जेवणाचे पार्सल घेऊन मोहम्मद रिजवान शाह हा स्विगी डिलिव्हरी बॉय गेला होता. जेवणाचे पार्सल घेण्यासाठी पीडित तरुणीने दरवाजा उघडला असता, आरोपी मोहम्मद रिजवान शाह याने पीडित तरुणीला पार्सल देताना तिला अयोग्यरित्या स्पर्श करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर तो त्या ठिकाणाहून निघून गेला. 

त्यानंतर बुधवारी पीडित तरुणीने पनवेल तालुका पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन तरुणी राहत असलेल्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा फोटो उपलब्ध करून घेतला. त्यावरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद रिजवान शाह याचा शोध घेऊन त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने जेवण देताना चुकून तरुणीला हात लागल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्याला नोटीस बजावून सोडून दिले. आवश्यक असेल त्यावेळी त्याला पुन्हा बोलावले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, ज्या प्रकरणांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे, अशा आरोपींना अटक करण्याची गरज नसल्याचेही दौंडकर यांनी सांगितले.   

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या 9 टंकी हुक्का पार्लरवर छापा