झोपेत असलेल्या आपल्या तिघा मित्रावर लोखंडी हातोडीने हल्ला

गरबा खेळण्यास विरोध करणाऱ्या तिघा मित्रावर मित्रानेच केला हातोड्याने हल्ला

नवी मुंबई  : दारू पियालेल्या तरुणाला नवरात्र उत्सवात गरबा खेळण्यास मित्रांनी मज्जाव केल्याने संतप्त झालेल्या सदर तरुणाने झोपेत असलेल्या आपल्या तिघां मित्रावर लोखंडी हातोड्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी रबाळे एमआयडीसीत उघडकीस आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघां मित्रापैकी आकाश जयस्वाल या तरुणाचा मृत्यू झाला असून जखमी असलेल्या इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघा मित्रावर हतोड्याने हल्ला करणाऱ्या जितेंद्र पटवा या तरुणाला अटक केली आहे.

या प्रकरणातील आरोपी जितेंद्र पटवा व मृत आकाश जयस्वाल तसेच जखमी अभिषेक भालेराव व राशिद खान हे चौघे मित्र असून ते रबाळे एमआयडीसीतील झोपडपट्टीत एकत्र राहण्यास आहेत. तसेच ते मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. गत सोमवारी रात्री या चौघा मित्रांनी आपल्या झोपडीमध्ये एकत्र दारू ढोसली. त्यानंतर ते घरातून फिरण्यासाठी बाहेर पडले. यावेळी परिसरामध्ये त्यांना दुर्गामाता गरबा मंडळाच्या वतीने गरबा नाच सुरू असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या जितेंद्र पटवा याने सदर गरब्याच्या ठिकाणी गरबा खेळण्याची इच्छा व्यक्त करून तो गरब्याच्या ठिकाणी गेला. मात्र जितेंद्र पटवा हा मद्यधुंद अवस्थेत त्याठिकाणी वेडवाकडे नृत्य करेल, त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी त्या सर्वांना मारून गरब्यातून बाहेर काढतील, अशी भिती त्याच्या मित्रांना होती. त्यामुळे तिघा मित्रांनी जितेंद्र पटवा याला सदर गरब्यामध्ये नाचण्यास विरोध केला. त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने जितेंद्रला पुन्हा आपल्या झोपडीत नेले.

या गोष्टीचा जितेंद्रला राग आल्याने त्याने सकाळी उठल्यानंतर झोपेत असलेल्या आपल्या तिघा मित्रावर लोखंडी हातोडीने हल्ला केला. या हल्ल्यात तिघे मित्र गंभीर जखमी झाल्याने तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी आकाश जयस्वाल याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी जितेंद्र पटवा याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकिस