तुर्भे गावात सुरूअसलेल्या अनधिकृत गॅरेजवर कारवाईची रहिवाशांची मागणी 

तुर्भे गावात अनधिकृरीत्या सुरू असलेल्या गॅरेजवर कारवाई करण्याची रहिवाशांची मागणी

नवी मुंबई : - तुर्भे गावात रहिवासी विभागात आय सी एल शाळेलगत सुरू असलेल्या अनधिकृत गॅरेजमुळे रहिवाशांना व शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या अनधिकृत गॅरेजवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. 

 तुर्भे गावात आय सी एल शाळेलगत सिडको वसाहतीत थाटण्यात आलेल्या अनधिकृत गॅरेज मुळे तुर्भे गावात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणारी वाहने भर रस्त्यात उभी राहत असल्याने येथील रस्त्यावरून जाताना नागरिकांना विशेषतः शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे.

या गॅरेजमधील वाहनांमुळे अनेकवेळा इतर वाहने अडकून, वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहन चालकांना देखील त्याचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. या अनधिकृत गॅरेज चालकाला महापालिकेचे अधिकारी व वाहतूक पोलिसांकडून अभय मिळत असल्याने गॅरेज चालकाची मुजोरी वाढत असल्याचा आरोप तेथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

एकीकडे या भागातील रस्त्यांवर अनधिकृत फेरेवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यातच या गॅरेजवाल्याने भररस्त्यात आपला व्यवसाय सुरू केल्याने या भागातील रहिवाशी हैराण झाले आहेत. येथील अनधिकृत फेरीवाले आणि गॅरेज विरोधात महापालिका कुठल्याच प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे रहिवाश्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येथील अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या गॅरेजवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशा कडून करण्यात येत आहे.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

झोपेत असलेल्या आपल्या तिघा मित्रावर लोखंडी हातोडीने हल्ला