आरोपी कुंदन भंडारीचा जामीन फेटाळला ; अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण 

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण 

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील तिसऱया क्रमांकाचा आरोपी कुंदन भंडारी याचा जामीन अर्ज पनवेल सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. भंडारी याला शंभरपेक्षा जास्त आजार जडल्याने त्याला उपचारासाठी जामिन द्यावा, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती. मात्र मुख्य वैद्यकीय अधिकाऱयाने दिलेल्या अहवालात तो ठणठणीत असल्याचे नमूद केल्याने त्याचा जामीन नामंजूर करण्यात आला.   

अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यामध्ये सध्या सायबर संगणक तज्ञ रोशन बंगेरा यांची उलटतपासणी सुरु आहे. बंगेरा यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे ते गेल्या दोन तारखांना न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्याच दरम्यान आरोपीच्या वकिलांनी कुंदन भंडारी याच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. तसेच भंडारीला अनेक आजार जडले असल्याने उपचारासाठी त्याला जामीन देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती. मात्र विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कुंदन भंडारी याला जामिन देण्यास  कडाडून विरोध केला. तसेच न्यायालयाने घरत यांच्या मागणीनुसार मुख्य वैद्यकीय अधिकाऱयांचा अहवाल मागवला. त्यात भंडारी याची तब्येत ठणठणीत असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे पनवेलच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पढेलवार यांनी जामीन अर्ज फेटाळून लावला. अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याची पुढील सुनावणी आता येत्या शुक्रवारी होणार असून या तारखेला मुख्य साक्षीदार सायबर संगणक तज्ञ रोशन बंगेरा यांची उलटतपासणी होण्याची शक्यता आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पीडित मुलीचे नाव व तिची ओळख उघड करून या सर्वांनी कायद्याचा भंग