सिडको कार्यालयात अधीक्षक अभियंता व सेवानिवृत्त सहा. कार्यकारी अभियंता लाच घेताना रंगेहात पकडले

15 हजाराची लाच स्विकारताना सिडकोचा अधीक्षक अभियंता व सेवानिवृत्त सहाय्यक कार्यकारी अभियंता अटकेत  

नवी मुंबई : सब कॉन्ट्रक्टरकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कम स्विकारणाऱया सिडकोच्या नवीन पनवेल कार्यालयातील अधीक्षक अभियंता प्रकाश बालकदास मोहिले (57) व सेवानिवृत्त सहाय्यक कार्यकारी अभियंता संजय डेकाटे या दोघांना अँन्टी करप्शन ब्युरो च्या नवी मुंबई युनिटने शुक्रवारी सायंकाळी सिडकोच्या कार्यालयात रंगेहात पकडले. या दोघांनी सिडको कार्यालयाच्या संरचनात्मक दुरुस्तीचे काम करणा-या कॉन्ट्रक्टरला अंतर्गत क्वॉलीटी ऑडिट रिपोर्टवर स्वाक्षरी करुन देण्यासाठी सदर लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे. 

या प्रकरणातील तक्रारदार सब कॉन्ट्रक्टरने सिडकोच्या नवीन पनवेल येथील नोडल ऑफिसच्या संरचनात्मक दुरुस्तीचे काम केले होते. या कामाच्या बिलाच्या मंजुरीसाठी त्याला अंतर्गत क्वॉलीटी ऑडिट रिपोर्टची आवश्यकता असल्याने कॉन्ट्रक्टरने सिडकोच्या नवीन पनवेल कार्यालयातील अधीक्षक अभियंता प्रकाश मोहिले यांच्याकडे अंतर्गत क्वॉलीटी ऑडिट रिपोर्टवर स्वाक्षरी करुन देण्यास विनंती केली होती. मात्र मोहिले यांनी त्याच्याकडे अंतर्गत क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर स्वाक्षरी करुन देण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे कॉन्ट्रक्टरने गत 15 सफ्टेंबर रोजी ऍन्टी करफ्शन ब्युरोच्या नवी मुंबई युनिटकडे तक्रार दाखल केली होती.  

त्यानुसार अँन्टी करप्शन ब्युरो या पथकाने याबाबत पडताळणी केली असता, अधीक्षक अभियंता मोहिले यांनी सिडकोतून सेवानिवृत्त झालेल्या सहाय्यक कार्यकारी अभियंता संजय डेकाटे यांच्याशी लाचेच्या रक्कमेसंदर्भात बोलणी करण्यास सांगितल्याचे आढळुन आले. डेकाटे याने देखील कॉन्ट्रक्टरकडे स्वाक्षरी देण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी केल्यानंतर अँन्टी करप्शन ब्युरो च्या नवी मुंबई युनिटने शुक्रवारी नवीन पनवेल येथील सिडकोच्या कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी डेकाटे याने कॉन्ट्रक्टरकडुन 15 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्याला अँन्टी करप्शन ब्युरो या पथकाने रंगेहात पकडले.  

त्यानंतर अँन्टी करप्शन ब्युरो च्या पथकाने अधिक्षक अभियंता प्रकाश मोहिले यांना नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयातून ताब्यात घेतले. सदरची कारवाई अँन्टी करप्शन ब्युरो च्या नवी मुंबई युनिटच्या पोलीस उपअधिक्षक ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

१५.९९ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडीटचा घोटाळा उघडकीस