गुटख्याचा साठा बाळगणा-या व्यक्तीला अटक

सव्वा चार लाखाचा गुटख्याचा साठा जप्त

नवी मुंबई : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने घणसोली सेक्टर-1 मधील एका रो-हाऊसवर छापा मारुन सुमारे सव्वा 4 लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जफ्त केला आहे. तसेच गुटख्याचा साठा वाहुन नेण्यासाठी वापरण्यात येणारी टिंन्टो वॅगन कार जफ्त करुन गुटख्याचा साठा करुन ठेवणा-या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडुन शोध घेण्यात येत आहे. या दुक्कलीने सदर गुटख्याचा साठा कुठून आणला याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 

घणसोली सेक्टर-1 मधील रो-हाऊसमध्ये तळमजल्यावरील घरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा करुन ठेवण्यात आल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या सुचनेनुसार गत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घणसोली सेक्टर-1 मधील संशयीत रो-हाऊसवर छापा मारला.  

यावेळी सदर रो-हाऊसच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमधुन दोन व्यक्ती भरलेल्या गोण्या रो-हाऊसमध्ये ठेवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यामुळे पोलिसांनी पकडलेल्या नदीम अहमद शकील अहमद (28) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गोण्यांमध्ये असलेल्या वस्तु बाबत विचारणा केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.  

त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरात असलेल्या गोण्या व कारमध्ये असलेल्या गोण्यांची तपासणी केली असता, त्यात सुमारे सव्वा चार लाख रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचे पाकिटे व सुगंधित सुपारीचा माल असल्याचे आढळुन आले. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सदरचा गुटख्याचा साठा तसेच कार जफ्त केली. त्यानंतर नदीम अहमद शकील अहमद व पळून गेलेला त्याच्या साथीदाराविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन नदीमला ताब्यात घेतले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

गल्लोगल्ली खिडकीत हात घालुन मोबाईल फोन व इतर किंमती वस्तु चोरणारा चोरटा अटक