नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचा पान शॉपवर छापा

तुर्भे येथील पान शॉपमधुन दोन गोण्या भरुन गुटख्याचा साठा जप्त

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी सायंकाळी तुर्भे सेक्टर-20 मधील एका पान शॉपवर छापा मारुन सदर पान शॉपमध्ये विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या विविध कंपन्याचा दोन गोण्यांने भरलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सदर पान शॉप मालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.  

तुर्भे सेक्टर-20 मधील केंद्रीय वखार व भांडागारच्या मेनगेट समोर असलेल्या मनोज पान शॉप मधुन विविध कंपन्यांचा पान मसला व सुगंधीत तंबाखुचा साठा करुन त्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिंगे व त्यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी तुर्भे सेक्टर-20 मधील मनोज पान शॉपवर छापा मारला.  

यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर पान टपरीची तपासणी केली असता, त्याच्या पायाजवळ दोन गोण्यांमध्ये विविध कंपन्याचा प्रतिबंधीत असलेला राजश्री पानमसाला, विमल पानमसाला, ब्लॅक लेबल 18 सुगंधी तंबाखु, व्हि वन सुगंधीत तंबाखुचा साठा आढळुन आला. सदर पानमसाला व सुगंधीत तंबाखुच्या साठयाबाबत पान शॉप चालक मनोज चौहान याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.  

त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर पान शॉपमध्ये सापडलेला सुमारे 25 हजार रुपये किंमतीचा पानमसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा जप्त केला. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने पान शॉप चालक मनोज चौहान याच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

तळोजा व आजुबाजुच्या परिसरात चैन स्नॅचींगच्या घटनांत वाढ