ब्लॅक स्पॉट्सवर आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ व कालबध्द रितीने करण्याच्या सूचना

नवी मुंबई  : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अपघातांची व त्यातील मृतांची संख्या ही मोठी असल्याने नवी मुंबई वाहतुक विभागाने वाढते अपघात रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वारंवार अपघात घडणारी 36 अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) शोधले आहेत. या ब्लॅक स्पॉट्सवर आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ व कालबध्द रितीने करण्याच्या सूचना नवी मुंबई वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी नवी मुंबई शहरातील विविध शासकीय प्राधिकरणांना तीन महिन्यापूर्वीच केल्या आहेत. काही शासकीय प्राधिकरणांनी संबंधित अपघात प्रवण क्षेत्रावर थोडयाफार सुधारणा केल्या आहेत. मात्र, काही प्राधिकरणांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत या वर्षात जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यामध्ये एकुण 464 अपघातांपैकी 190 प्राणांतिक अपघातात 195 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अपघातातील मृतांमध्ये दुचाकी अपघातांची संख्या सर्वाधिक असून त्यात दुचाकीस्वारासह त्यांच्यासोबत असलेले सहप्रवाशी तसेच पादचारी अशा एकुण 97 जणांचा बळी गेला आहे. त्याखालोखाल 28 पादचाऱयांचा मृत्यू झाल्याचे आढळुन आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाढते अपघात रोखण्यासाठी नवी मुंबई वाहतुक विभागाकडुन विविध प्रकारच्या उपाययोजना करण्याबरोबरच वाहतुकीचे नियम मोडणाऱया वाहन चालकांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.  

त्याचप्रमाणे वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करु नये यासाठी त्यांच्यामध्ये नियमीत जनजागृती देखील करण्यात येते, मात्र त्यानंतर देखील अनेक वाहन चालक हे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळुन येत आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत व त्यातील मृत व जखमींच्या संख्येत वाढ होताना दिसुन येत आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी नवी मुंबई वाहतुक विभागाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व रस्त्यांचा सर्वे करुन वारंवार अपघात घडणारी 36 अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) शोधले आहेत. या ब्लॅक स्पॉट्सवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना नवी मुंबई वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी नवी मुंबई शहरातील विविध शासकीय प्राधिकरणांना केल्या आहेत. 

नवी मुंबई वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्तांनी विविध शासकीय प्राधिकरणांना ब्लॅक स्पॉट्स संदर्भात सूचित केलेल्या पत्रात नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील मागील तीन वर्षांची अपघात प्रवण क्षेत्रातील अपघातांची तसेच मयतांची आकडेवारी नमूद केली आहे. तसेच अपघात कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने अपघात निवारणासाठी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करण्याकरिता काही उपाययोजना सूचविल्या आहेत.  

यामध्ये ब्लॅक स्पॉट पासून दोन्ही दिशेला 50 मीटर अंतरावर पुढे अपघाती स्थळ आहे, वेग मर्यादा ताशी 20 कि.मी. ठेवण्याबाबत मोठे दर्शनी बोर्ड लावणे, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन, थर्मोफ्लास्ट पेंट, कॅटाईज ब्लिंकर्स व ब्लॅक स्पॉट पासून 30 मीटर अंतरावर दोन्ही बाजूस रम्बलर स्ट्रीफ्स बसविणे आदी स्वरुपाच्या उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे. याशिवाय ब्लॅक स्पॉट्स क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती व वाहतुकीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्या त्या क्षेत्राच्या गरजेनुसार रोलर क्रॅश बॅरिअर, पादचारी पुल, रोड जॉमेट्री इंम्प्रुव्हमेंट, टेबल टॉप क्रॉसिंग, पथदिवे व्यवस्थेत वाढ अशा उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

विसर्जन मिरवणुकीतील राडयानंतर ऐरोलीतील माजी नगरसेवक एम.के.मढवी पिता पुत्रासह 10 ते 15 व्यक्तींवर गुन्हा दाखल