पामबीच मार्गावर रस्ता दुभाजकाला मोटारसायकल धडकुन 2 ठार 1 जखमी  

मोटारसायकल रस्तादुभाजकावर धडकुन अपघात 

नवी मुंबई : बेलापुर येथून पामबीच मार्गे सानपाडा येथे मोटारसायकलवरुन ट्रिपल सिट जाणाऱया तरुणांची मोटारसायकल रस्ता दुभाजकावरील झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन तरुणांचा मृत्यू तर तिसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री नेरुळ येथे घडली. या अपघातातील तिसऱया जखमी तरुणाची प्रकृती देखील चिंताजनक असून त्याच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेरुळ पोलिसांनी या अपघाताला मोटारसायकल चालकाला जबाबदार धरुन त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.  


या अपघातात मृत झालेल्या तरुणांमध्ये राज सागर जेना (16) व राजेश सहा (27) या दोघांचा समावेश आहे. तर जखमी शवान हमीद मुल्ला (21) हा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही सानपाडा सेक्टर-5 भागात राहण्यास असून रविवारी रात्री ते पामबीच मार्गावर टीव्हीएस रायडर या मोटरसायकलवरुन फेरफटका मारण्यासाठी गेले होते. पामबीच मार्गावर राईड केल्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हे तिघेही पामबीच मार्गावरुन सानपाडा येथे परतत होते. यावेळी भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या मोटारसायकलवरील चालकाचा ताबा सुटल्याने सदरची मोटारसायकल  पामबीच मार्गावरील सारसोळे जंक्शनच्या अलिकडे रस्ता दुभाजकासह तेथील झाडावर जोरात धडकली. त्यामुळे या अपघातात मोटारसायकलवरील तिघेही गंभीर जखमी झाले.  


यातील राज सागर जाना (16) याचा रुग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यू झाला. त्यानंतर नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान राजेश सहा याचा देखील पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. या अपघातातील मोटारसायकल चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवुन नेल्याने त्यांची मोटारसायकल रस्तादुभाजकावर धडकुन अपघात झाल्याचे आढळुन आले आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर तिसरा अद्याप बोलण्याच्या स्थितीत नसल्याने  मोटारसायकल कोण चालवत होता, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी मोटारसायकल चालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.  
 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवीन पनवेल व सुकापुर भागातील दोन घरे फोडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास