नवी मुंबई आरटीओच्या वतीने जप्त केलेल्या टुरिस्ट कार टॅक्सींचा लिलाव  

नवी मुंबई उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाकडुन ई-लिलाव पद्धतीने जाहिर लिलाव 

नवी मुंबई : मुंबई मोटार वाहन अधिनियमांतर्गत मोटार वाहन कर न भरलेल्या व नवी मुंबई आरटीओ कार्यालयाने जप्त केलेल्या टुरिस्ट कार वाहनांचा जाहीर लिलाव येत्या दि.12 सफ्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता एपीएमसीतील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय  येथे होणार आहे. इच्छुक व्यक्तींनी या लिलावात मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन नवी मुंबईच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.  

मुंबई मोटार वाहन अधिनियमांतर्गत मोटार वाहन कर न भरणारी टुरिस्ट वाहने नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केली आहेत. जफ्त करण्यात आलेल्या टुरिस्ट कार वाहनांच्या मालकांना त्यांच्या वाहनांचा थकीत कर भरण्यासंदर्भात कळविण्यात आल्यानंतर देखील अनेक वाहन मालकांनी कर भरलेला नाही. त्यामुळे अशा वाहनांचा नवी मुंबई उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाकडुन ई-लिलाव पद्धतीने जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. असे असले तरी या वाहनांच्या थकबाकीदारांना लिलावाच्या तारखेपर्यंत कर भरण्याची संधी आरटीओने दिली आहे.  

दरम्यान, लिलाव करण्यात येणा-या वाहनांची यादी एपीएमसीतील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सूचना फलकावर माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच लिलावासाठी उपलब्ध असलेली वाहने एपीएमसीतील धान्य मार्केट, सेक्टर नं.19 ब टी ब्लॉक, गेट क्र.7, येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी इच्छुक व्यक्तींना प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. लिलावाच्या अटी लिलावाच्या अगोदर ऑनलाईन प्रसिध्द करण्यात येणार आहेत. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई च्या दूरध्वनी क्र.022-27830701 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.    

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पामबीच मार्गावर रस्ता दुभाजकाला मोटारसायकल धडकुन 2 ठार 1 जखमी