3 वर्षापासून नवी मुंबईत बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असलेल्या अमेरिका देशातील महिलेवर कारवाई  

नवी मुंबई : व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील मागील 3 वर्षे नवी मुंबईत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या एका अमेरिकन महिलेवर नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने कारवाई केली आहे. पोला अंजनाम्मा असे या महिलेचे नाव असून सदर महिला जुलै 2019 पासून नवी मुंबईत बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असल्याचे चौकशीत आढळुन आले आहे. त्यामुळे विशेष शाखेने या महिलेकडुन 34,400 रुपयांचा दंड वसुल करुन तिला अमेरिकेत पाठवुन दिले आहे.  

अमेरिकन नागरिक असलेली पोला अंजनाम्मा हि महिला 10 जानेवारी 2019 रोजी टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. या महिलेला 180 दिवस भारतात राहण्याच्या अटीवर व्हिसा मंजुर करण्यात आला होता. जुलै 2019 मध्ये व्हिजाची मुदत संपण्यापुर्वी या महिलेला भारतातुन आपल्या देशात परत जाणे बंधनकारक होते. मात्र त्यानंतर सदर महिला जुलै 2019 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत तब्बल 1150 दिवस नवी मुंबईत बेकायदेशिररीत्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्यास राहिली. यादरम्यान गत महिन्यात 9 ऑगस्ट रोजी सदर महिला एक दिवसासाठी कोपरखैरणेतील सिएस्टा हॉटेलमध्ये राहण्यास गेली होती. परंतु हॉटेल व्यवस्थापनाकडुन या महिलेची उशीरा माहिती दिली गेल्यामुळे या महिलेला पकडता आले नाही.  

मात्र सदर महिला 21 ऑगस्ट रोजी पुन्हा सीबीडी बेलापुर येथील सफायर हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेल्यानंतर तेथील हॉटेल व्यवस्थापनाने सी-फॉर्मद्वारे नोंदणी करुन तत्काळ सदर परदेशी महिलेची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाला दिली. त्यानंतर विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्त रुपाली अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परदेशी नागरिक नोंदणी विभागाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.विशाल माने व पोलीस हवालदार गुरव, पवार यांनी तत्काळ सदर परदेशी नागरिक महिलेकडे चौकशी केली असता, सदर महिलेने व्यवस्थित माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली.  

त्यानंतर पोलिसांनी सदर महिला ही बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याचे तसेच सदरची कृती ही व्हिसा तरतुदीचे उल्लंघन करणारी व दखलपात्र गुन्हा असल्याचे तिला सांगितले. तसेच त्या स्वत:हुन तत्काळ आपल्या देशात न गेल्यास त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असेही त्या महिलेला सांगण्यात आले. त्यानंतर सदर महिलेने तिचा गुन्हा कबुल करुन भारतातुन स्वत:हुन बाहेर जाण्याची संमती दर्शविली. त्यानंतर सदर महिलेने येत्या 9 सफ्टेंबर पुर्वी भारतातुन एक्झिट परमिशनसाठी अर्ज केला आहे. तसेच भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याबद्दल तिला ठोठावण्यात आलेला 34,400 रुपयांचा दंड त्यांनी गत 27 ऑगस्ट रोजी परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाकडे ऑनलाईन भरला आहे.    

रुपाली अंबुरे-(पोलीस उपआयुक्त विशेष शाखा, नवी मुंबई)  

 हॉटेल, हॉस्पीटल, गेस्ट हाऊस, धर्मशाळा, शैक्षणीक संस्थां,घर फ्लॅट किंवा गृहनिर्माण सोसायटीमध्ये वास्तव्यास येणाऱया परदेशी नागरिकांना किंवा त्यांना वास्तव्यास ठेवणाऱया आस्थापनांनी www.indianfrro.gov.in/frro/formC या संकेतस्थळावर ऑनलाईन सी फॉर्म/एस फॉर्म भरुन नोंदणी करणे आणि सीबीडी बेलापुर येथील पोलीस आयुक्त कार्यालयातील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात अधिक चौकशी आणि कार्यवाहीसाठी तत्काळ लेखी कळविणे बंधनकारक आहे. विदेशी नागरीकांसंदर्भात केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर विदेशी व्यक्ती नोंदणी अधिनियम 1939, विदेशी व्यक्ती अधिनियम 1946, तसेच भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येते. तसेच पासपोर्ट व व्हिसा नियमांचे उल्लंघन करणा-या परदेशी नागरिकांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाते.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई आरटीओच्या वतीने जप्त केलेल्या टुरिस्ट कार टॅक्सींचा लिलाव