सासरकडील मंडळीच्या छळाला कंटाळून कोपरखैरणेत विवाहितेची आत्महत्या  

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर-18 मध्ये राहणा-या हर्षदा हेमंत तरंगे (21) या  विवाहित तरुणीने सासरकडील मंडळीच्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळुन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र हर्षदाने आत्महत्या केली नसून तिच्या सासरकडील मंडळींनी तिची हत्या केल्याचा आरोप मृत हर्षदाच्या आई-वडिलांनी केला आहे. तसेच या संपुर्ण प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास करुन हर्षदाच्या सासरकडील मंडळीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.  

या घटनेतील मृत हर्षदा हि मुलुंड येथे राहण्यास होती, तसेच ती इंजिनियरींगचे शिक्षण घेत होती. हर्षदाच्या पालकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत ऑगस्ट 2020 मध्ये तिचा विवाह कोपरखैरणेत राहणा-या हेमंत तरंगे याच्या सोबत करुन दिला होता. लग्नाच्या दुस-या दिवसापासून हर्षदाची सासु मिताबाई व नणंद दिपाली मदने या दोघींनी  मोबाईल फोनवर बोलण्यावरुन हर्षदावर दबाव टाकण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लग्नातील मानपान, लग्नात दिलेल्या संसारोपयोगी वस्तु देण्यावरुन, पतीला सोन्याची चैन देण्यावरुन तसेच घरातील छोटया छोटया गोष्टीवरुन हर्षदाचा मानसिक व शारीरीक छळ करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे तिला वेगळे राहायचे असल्यास माहेरुन 20 लाख रुपये घेऊन येण्यास तिच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्यास सुरुवात केली.   

हर्षदा याबाबत नेहमी आपल्या आई वडिलांना फोनवरुन माहिती देत होती. मात्र ते आज ना उद्या सर्व सुरळीत होईल असे सांगुन ते तिची समजुत काढत होते. मात्र त्यानंतर देखील हर्षदाचा तिच्या सासरकडील मंडळीकडुन छळ सुरुच राहिला. या सर्व छळाला कंटाळुन  गत 30 ऑगस्ट रोजी हर्षदाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती हर्षदाच्या सास-यांनी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास तिचे वडील कुंडलिक वाघमोडे यांना दिल्यानंतर त्यांनी कोपरखैरणे येथे धाव घेतली. त्यानंतर त्यांनीच आपल्या मुलीला खाली उतरून रुग्णालयात नेले. या प्रकारानंतर कोपरखैरणे पोलिसांनी हर्षदाचा पती हेमंत, दिर धवल, नणंद दिपाली मदने, सासु मिताबाई, सासरे अण्णासाहेब तरंगे या सर्वां विरोधात छळवणुकिसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पती हेमंत तरंगे याला अटक केली आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

3 वर्षापासून नवी मुंबईत बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असलेल्या अमेरिका देशातील महिलेवर कारवाई