७० फिर्यांदींना १.४२ कोटींचा मुद्देमाल परत


नवी मुंबई ः नवी मुंबई पोलिसांनी विविध गुन्ह्यांचा छडा लावून परत मिळविलेला सुमारे १ कोटी ४२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ७० फिर्यादींना परत करण्यात आला. याप्रसंगी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह-पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव, परिमंडळ१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, मराठी साहित्य संस्कृती-कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी तसेच परिमंडळ-१ मधील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी चोरीस गेलेला ऐवज परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.  
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-१ अंतर्गत असलेल्या १० पोलीस ठाण्यात मागील वर्षात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा पोलिसांनी उत्कृष्टरित्या तपास करुन चोरीस गेलेला आणि फसवणूक केलेली मालमत्ता हस्तगत केली आहे. गत वर्षभरामध्ये परिमंडळ-१ मधील विविध पोलीस ठाण्यांकडून सुमारे १ कोटी ४२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल परत मिळविला आहे. हाच मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्या हस्ते ७० फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार वाहने आणि इतर वस्तू फिर्यादींना परत करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोरी तसेच फसवणूक या सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यावेळी फिर्यादींना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले. 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सासरकडील मंडळीच्या छळाला कंटाळून कोपरखैरणेत विवाहितेची आत्महत्या