हेवी डिपॉझीटवर भाड्याने घर देण्याचा बहाणा

नवी मुंबई ः वाशी परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याने त्यांच्या मालकीचे वाशी, सेक्टर-१५ मधील बी-२/१२ हा एकच पलॅट सहा वेगवेगळ्या व्यक्तींना हेवी डिपॉझिटवर भाड्याने देऊन त्यांच्याकडून तब्बल ६० लाख रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, या दाम्पत्याने यातील एकालाही घराचा ताबा अथवा त्यांची रक्कम परत केलेली नाही. वाशी पोलिसांनी देखील या दाम्पत्यावर कोणतीही कारवाई न केल्याने ‘हिंद मजदूर किसान पंचायत'ने थेट पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्याकडे या दाम्पत्याबाबत तक्रार करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सदर प्रकरणात भाडोत्रींची फसवण्ुक करणारे मोहम्मद सलिम आणि त्यांची पत्नी नसरीन शेख या दाम्पत्याचे वाशी, सेक्टर-१५ मध्ये बी-२/१२ पलॅट आहे. हाच पलॅट हेवी डिपॉझिटवर भाड्याने देण्याच्या बहाण्याने या दाम्पत्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळले आहे. त्यापैकीच एक असलेल्या सपना बाबुशंकर पाल यांनी जून महिन्यात या दाम्पत्याचे घर हेवी डिपॉझिटवर घेण्यासाठी या दाम्पत्याला १५ लाख रुपये देऊन ३६ महिन्यांचा कारार केला. मात्र, प्रत्यक्षात घर ताब्यात घेण्यास गेल्यानंतर सदर घरात मोरे नावाचा व्यक्ती राहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराचा ताबा घ्ोतलेल्या मोरे यांच्याकडून मोहम्मद सलीम याने १४ लाख रुपये घेऊन हेवी डिपॉझिटवर सदरचे घर भाड्याने घ्ोतल्याचे मोरे याचे म्हणणे आहे. तसेच जोपर्यंत त्याचे पैसे त्याला मिळणार नाहीत, तोपर्यंत तो घर खाली करणार नसल्याचे मोरे सर्वांना सांगत आहे.

पाल यांच्या प्रमाणेच सुदालय कोणार यांनी देखील एप्रिल २०१९ मध्ये सदरचे घर एक वर्षासाठी हेवी डिपॉझिटवर भाड्याने घेऊन मोहम्मद सलीम आणि त्याच्या पत्नीला १० लाख रुपये दिले. त्याचप्रमाणे फातिमा मुन्ना शेख यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये सदरचे घर भाड्याने घेण्यासाठी शेख दाम्पत्याला ४ लाख रुपये हेवी डिपॉझिटची रक्कम दिली. हार आणि फुले विकुन उदरनिर्वाह चालविणऱ्या चांद मोहम्मद मोमीन या अपंग व्यक्तीने सप्टेंबर २०२१ मध्ये वडिलोपार्जित घर विकून १४ लाख रुपये या दाम्पत्याला देऊन हेवी डिपॉझिटवर त्यांचे घर भाड्याने घ्ोण्याचा प्रयत्न केला. तसेच साजिदा इकराम खाकरा यांनी देखील एप्रिल २०१८ मध्ये या दाम्पत्याला ५ लाख हेवी डिपॉझिट दिले. तसेच अफरोज इनतेखाब खान या विधवा महिलेने पतीच्या मृत्युनंतर या दाम्पत्याला ९ लाख रुपये देऊन भाड्याने घर घेण्याचा प्रयत्न केला.

मोहम्मद सलीम आणि त्याच्या पत्नीने आतापर्यंत सहा भाडोत्रींकडून गत पाच वर्षामध्ये हेवी डिपॉझिटवर घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून तब्बल ६० लाख रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे या सर्व भाडोत्रींचे भाडे करारनामे सहा.दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत केले गेले आहेत. मात्र, यातील एकालाही आजपर्यंत घर दिले नाही. उलट पैसे परत मागणाऱ्या भाडोत्रींना या दाम्पत्याने वेगवेगळ्या पध्दतीने धमकावण्याचा प्रयत्न केला. वाशी पोलिसांकडे या भाडोत्रींनी लेखी तक्रारी देखील केल्या. मात्र, या दाम्पत्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे ‘हिंद मजदूर किसान पंचायत'चे महाराष्ट्र सरचिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी सांगितले. दरम्यान, सदर दाम्पत्यावर कारवाई न झाल्यास फसवणूक झालेल्या सहा भाडोत्रींनी आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांना दिलेल्या तक्रारीद्वारे दिला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ७० फिर्यांदींना १.४२ कोटींचा मुद्देमाल परत