फरार आरोपीकडे सापडले अवैध पिस्तुल

 

नवी मुंबई ः देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. सलमान नासिर कलदानी (४४) आणि जितेंद्रसिंग अमरसिंग मदोरिया (२६) अशी या दुकलीची नावे असून यातील सलमान कलदानी याने २५ दिवसांपूर्वी कोपरी गांव येथील स्मशानभूमीजवळ आपल्या कारने तीन-चार व्यक्तींना धडक देऊन पलायन केले होते. या अपघातात एका वृध्दाचा मृत्यू झाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी २५ ऑगस्ट रोजी त्याला मित्रासह पकडल्यानंतर त्याच्या कारमध्ये विनापरवाना पिस्तुल आणि जिवंत काडतूस आढळुन आल्याची माहिती परिमंडळ-१चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.


एपीएमसी पोलिसांनी अटक केलेला आरोपी सलमान नासिर कलदानी याने १ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास कोपरी गावातील स्मशानभूमीजवळ स्विपट डिझायर कारने तीन-चार व्यक्तींना धडक देऊन पलायन केले होते. या अपघातात ममचंद जैन नामक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी एपीएमसी पोलिसांनी कार चालक सलमान कलदानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. २५ ऑगस्ट रोजी आरोपी सलमान कलदानी एपीएमसी मधील एमएच-४३ बार जवळ येणार असल्याची माहिती एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांना मिळाली होती.

त्यानंतर त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख आणि नितीन सांगळे यांचे पथक तयार केले होते. त्यानुसार पोलिसांचे पथक त्याच्या पाळतीवर असताना तो विटारा ब्रेझा कारमधून येत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, कलदानी याने वाहन न थांबवता तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करुन त्याला आणि त्याचा साथीदार जितेंद्रसिंग या दोघांना पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कारची झडती घेतली असता त्याच्या कारमध्ये देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस सापडले. त्यानंतर पोलिसांनी सदरचे पिस्तुल आणि काडतूस जप्त केले. सदर आरोपींनी पिस्तुल कुठून आणि कशासाठी आणले? याचा तपास सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. न्यायालयाने या दोघांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केल्याचेही पानसरे यांनी सांगितले.

 

 
Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

खाजगी बस चालक अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लुटमार