महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नवी मुंबईत चेन स्नॅचर्सचा हैदोस
नवी मुंबई ः चेन स्नॅचींग करणाऱ्या लुटारुंनी मागील काही दिवसांपासून नवी मुंबईत हैदोस घातला असून सदर लुटारु मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना लक्ष करत असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे या लुटारुंचा अटकाव करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत सकाळी ५ ते ८ या वेळेत नाकाबंदी लावून संशयास्पद वाहनांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाकाबंदीच्या ठिकाणी प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वतः जातीने हजर राहून गुन्हेगारांवर वॉच ठेवत आहेत.
चेन स्नॅचींग करणाऱ्या लुटारुंनी मागील काही दिवसांपासून नवी मुंबईत पुन्हा आपल्या कारवाया वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सदर लुटारु लक्ष करत असल्याचे आढरून आले आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी या लुटारुंनी वाशी, कोपरखैरणे आणि सानपाडा या भागात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तीन व्यवतींच्या अंगावरील लाखो रुपये किंमतीचे दागिने लुटले आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही चेन स्नॅचींगच्या गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. २० ऑगस्ट रोजी या लुटारुंनी कामोठे, सेक्टर-3६ मध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या धर्मेंद्रकुमार वर्मा यांच्या गळ्यातील तब्बल १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे दागिने लुटून नेले आहेत.
त्याचप्रमाणे १३ ऑगस्ट रोजी या लुटारुंनी पत्नीसह पामबीच मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मदनमोहन नायक या जेष्ठ नागरिकाच्या गळ्यातील १ लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन खेचून नेली आहे. सदर लुटारु मॉर्निंग वॉकसाठी सकाळच्या सुमारास बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना लक्ष करुन त्यांचे दागिने लुटून नेत असल्याचे या सर्व घटनांवरुन दिसून येत आहे. या लुटारुंच्या वाढत्या कारवायांमुळे नवी मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे. त्यामुळे चेन स्नॅचींग करणाऱ्या लुटारुंच्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी तसेच त्यांना अटकाव करण्यासाठी सर्व पोलीस ठाणे अंतर्गत नाकाबंदी करण्याच्या आणि संशयित वाहनांची तपासणी करण्याच्या सक्त सूचना पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह आणि सह-पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
विशेष म्हणजे प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांना नाकाबंदीच्या ठिकाणी जातीने हजर राहण्याची सक्त ताकीद देखील देण्यात आली आहे. त्यानुसार २३ ऑगस्ट रोजी सकाळी ५ ते ८ या वेळेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील २० पोलीस ठाणे अंतर्गत महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी नाकाबंदीच्या ठिकाणी हजर होते. त्याचप्रमाणे पोलीस उपआयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांनी देखील प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. पोलिसांकडून २३ ऑगस्ट रोजी सकाळी लावण्यात आलेल्या या नाकाबंदीमुळे नागरिकांमध्ये मात्र कुतूहल निर्माण झाले होते.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत या वर्षामध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत ८७ चेन स्नॅचींगचे गुन्हे घडले असून यातील फक्त २८ गुन्हे उघडकीस आले आहेत. गत २०२१ या वर्षातील पहिल्या सहा महिन्यामध्ये चेन स्नॅचींगचे ४३ गुन्हे घडले होते, त्यातील फक्त १५ गुन्हे उघडकीस आले होते. सदर आकडेवारीवरुन या वर्षात चेन स्नॅचींगच्या गुन्ह्यात ४४ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
चेन स्नॅचींग करणाऱ्या लुटारुंना अटकाव करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत महत्वाच्या ५ ठिकाणी सकाळच्या सुमारास नाकाबंदी करुन संशयस्पद वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. पुढील चार-पाच दिवस नाकाबंदी सुरु राहणार आहे. तसेच चेन स्नॅचींग करणाऱ्या लुटारुंना पकडण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.
-विवेक पानसरे, पोलीस उपआयुवत-परिमंडळ-१, नवी मुंबई.