मोबाईल फोन स्नॅचींग करणारे त्रिकुट जेरबंद,  

नवी मुंबई : रस्त्याने मोबाईलवरुन बोलत जाणा-या व्यक्तींच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने खेचणा-या तीन सराईत लुटारुंना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. आकाश कांबळे (22), सिद्धेश सुरेश मौर्य (26) आणि इम्रान जाकिर शेख (30) अशी या लुटारुंची नावे असून या लुटारुंनी नवी मुंबईच्या विविध भागातून लुटलेले चार मोबाईल फोन तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेली स्कुटी असा सुमारे 1 लाख 33 हजार रुपये किंमतीचा ऐवज गुन्हे शाखेने या तिघांकडुन हस्तगत केला आहे.  
 
या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी आकाश कांबळे आणि सिद्धेश मौर्य हे दोघेही कोपरखैरणे भागात राहण्यास असून गत 17 जुन रोजी या लुटारुंनी वाशीतील फादर ऍग्नल कॉलेजमधून पायी चालत वाशी डेपोकडे जाणा-या एका विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल फोन खेचुन पलायन केले होते. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाकडुन समांतर तपास करण्यात येत होता. यादरम्यान चोरीचे मोबाईल फोन विकण्यासाठी दोन व्यक्ती कोपरखैरणेतील डी मार्ट जवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने सापळा लावुन आकाश कांबळे व सिद्धेश मौर्य या दोघांना स्कुटीसह ताब्यात घेतले.  
 
त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांची कसुन चौकशी केली असता, आकाश कांबळे याने इम्रान जाकिर शेख याच्या सोबत देखील मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला देखील या प्रकरणात अटक केली. या तिघांच्या चौकशीत त्यांनी वाशी, एपीएमसी,नेरुळ, तुर्भे व एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल स्नॅचींगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी या तिघांना अटक करुन त्यांच्याकडून चार मोबाईल फोन तसेच गुन्हे करण्यासाठी त्यांनी वापरलेली स्कुटी जप्त केली आहे. सदरची कारवाई मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व पोलीस अंमलदार मंगेश वाट, शशीकांत शेंडगे, नितीन जगताप, राहुल वाघ, लक्ष्मण कोपरकर, किरण राऊत,सचिन टिके, सतिष चव्हाण आदींच्या पथकाने केली.  
 

 

 
Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 सीवूड्‌स मधील आश्रमशाळेतील ३ मुलींवर लैंगिक अत्याचार