नोकरीच्या बहाण्याने शेकडो तरुणांची करोडोंची फसवणूक

तरुणांना न्याय न मिळाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा

नवी मुंबई : वाशी येथील हावरे फॅन्टासिया मॉलमधे कार्यालय थाटून विविध प्रसारमाध्यमांवर नोकरीची जाहिरात देऊन देशातील विविध भागातील शेकडो तरुणांची करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक करुन महाठग पसार झाल्याने फसवणूक झालेले तरुण मदतीच्या अपेक्षेने वाशी पोलीस स्टेशन तसेच हावरे फॅन्टासिया मॉलमधील बंद कार्यालयासमोर दररोज फेऱ्या मारत आहेत. अशाच काही तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना शिपिंग युनियनचे राज्य उपाध्यक्ष सविनय म्हात्रे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

वाशी हावरे फॅन्टासिया मॉल येथील प्राईम इंटरनॅशनल टूर्स आणि ट्रॅव्हल्स या नावाने कार्यालय थाटून राज मिश्रा आणि नावेद अली यांनी  तुर्की विविध पदांवर नोकऱ्या उपलब्ध असून संबंधित कार्यालयात संपर्क साधण्याची जाहिरात देऊन देशभरातील ३००-४०० युवकांकडून  सुरुवातील १५००० रुपये जमा करुन व्हिसा आणि फ्लाईट तिकीट आल्यावर उर्वरित ७००००-८०००० जमा करुन घेतले  आणि  नोकरीच्या आशेने काही तरुण विमानतळावर गेल्यावर त्यांचे विमानतिकीट काही तांत्रिक कारणांमुळे रद्द झाल्याचे प्राईम इंटरनॅशनल टूर्सच्या दोन्ही संचालकांनी संबंधित तरुणांना  सांगितले आणि काही दिवसांत दुसरे तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, काही दिवसांनी दोन्ही संचालकांनी आपले मोबाईल बंद केले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हावरे मॉलस्थित कार्यालयात तरुण जमा झाले असता कार्यालय बंद करून दोघे ठग पळून गेल्याने तरूणांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.

 यातील फसवणूक झालेल्या तरुणांनी वाशी पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली असून या प्रकरणाचा तपास चालू असल्याचे पोलीस सांगत आहेत.  शेकडो तरुण रोज रोज पोलीस स्थानक आणि कार्यालयात मदतीच्या आशेने फेऱ्या मारत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची संबंधित तरुणांनी  भेट घेऊन मदतीची मागणी केली आहे. मनसे पदाधिकऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधून लवकरात लवकर या तरुणांना न्याय देण्याची मागणी केली असून लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे. तरुणांना न्याय न मिळाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी दिला आहे. यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे , नाविक सेनेचे दिनेश पाटील, विशू सुद्दाळा, प्रतीक पेंढारी, विनोद पाखरे उपस्थीत होते.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मोबाईल फोन स्नॅचींग करणारे त्रिकुट जेरबंद,