कोपरखैरणे रेल्वे स्थानकात झोपलेल्या दोघा तरुणांना मारहाण करुन लुटले 

नवी मुंबई : नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी बुलढाणा येथुन कोपरखैरणेत आलेल्या व ओळखीचे नातेवाईक नसल्याने रात्री कोपरखैरणे रेल्वे स्टेशन आवारात झोपलेल्या दोघा तरुणांना 5 जणांच्या टोळीने बेदम मारहाण करुन त्यांच्याजवळ असलेला 25 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन लुटल्याची घटना गत बुधवारी पहाटे घडली. वाशी रेल्वे पोलिसांनी या घटनेतील टोळी विरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

या घटनेतील तक्रारदार विकास राठोड (21) हा तरुण बुलढाणा जिह्यातील असून त्याला घणसोली येथील रॅपटिंग लॅबमधील नोकरीसाठी 31 जुलै रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यामुळे विकास त्याचा मित्र सुरेश चव्हाण याच्यासोबत 28 जुलै रोजी ठाण्यात आला होता. त्यानंतर दोघेही दोन दिवस ठाण्यात राहिल्यानंतर 30 जुलै रोजी ते रात्री कोपरखैरणेत आले होते. या दोघांचे मुंबईत कुणीही नातेवाईक नसल्याने तसेच त्यांच्याकडे राहण्याची सोय नसल्याने दोघेही रात्री जेवण करुन कोपरखैरणे रेल्वे स्टेशन बाहेरील पॅसेजमध्ये झोपले होते. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी आलेल्या 5 जणांच्या टोळीने या दोघांना उठवुन त्यांच्याकडे मोबाईल फोनची मागणी केली. 

 यावेळी सुरेश चव्हाण हा मदत मिळविण्यासाठी कोपरखैरणे रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये पळून गेला. मात्र यावेळी सदर लुटारुंनी विकासला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर सदर लुटारुंनी विकास जवळ असलेला 25 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन घेत त्याठिकाणावरुन पलायन केले. त्यानंतर विकास आणि सुरेश या दोघांनी रेल्वे स्थानकावर असलेल्या पोलिसांची मदत घेऊन वाशी रेल्वे पोलीस ठाणे गाठुन घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी 5 जणांच्या टोळी विरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नोकरीच्या बहाण्याने शेकडो तरुणांची करोडोंची फसवणूक