ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत संपन्न

नवी मुंबई महापालिका - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षण सोडत संपन्न

नवी मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये नागरिकांच्या ओबीसी प्रभाग आरक्षण सोडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी २०.५ % आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेतील एवूÀण ४१ प्रभागातील १२२ उमेदवारांमधून २५ उमेदवारांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये १३ महिला आणि १२ पुरुष ओबीसी उमेदवार असणार आहेत. त्यानुसार २९ जुलै रोजी  ओबीसी, ओबीसी (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षण सोडत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुवत अभिजीत बांगर यांची
प्रमुख उपस्थिती होती.


दरम्यान, आरक्षण सोडतीनंतर आता ३० जुलै रोजी आरक्षण प्रारुप यादी प्रसिध्द केली जाणार आहे. यानंतर ३० जुलै ते २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षणाबाबत हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत. महपालिका मुख्यालय मधील निवडणूक विभाग आणि महापालिकेच्या आठ विभाग कार्यालयांमध्ये सदरच्या हरकती-सूचना नोंदविता येतील. तर सदर सोडतीच्या अंतिम प्रक्रियेनंतर येत्या दोन महिन्यात महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूका प्रथमच बहुसदस्य पध्दतीने (पॅनल) होत आहेत. महापालिकेत एकूण ४१ प्रभाग असून यात ४० प्रभाग त्रिसदस्यीय तर एक प्रभागात द्विसदस्यीय पद्धतीने असणार आहे. एकूण
प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत २०.५९ टक्के जागा नागरिकांच्या मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवल्या आहेत. यासाठी आता नागरिकांच्या सूचना-हरकती दाखल केल्यावर याबाबत अंतिम निर्णय निवडणूक आयोगामार्फत घ्ोतला जाणार आहे. सर्वसाधारण महिला खुल्या प्रवर्गात २० प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले. या आरक्षण सोडतीकडे मोजके नेते वगळता सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.


नवी मुंबईतील लोकसंख्या वाढल्याने लोकसंख्येच्या तुलनेत यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ११ जागा नगरसेवकांच्या वाढल्या आहेत. शहरात ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा असून विधानसभेतील नगरसेवक संख्येची तुलना केल्यास केल्यास वाढलेली नगरसेवक संख्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात जास्त आहेत.


एकूण १२२ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवकांच्या जागा अनुसूचित जाती-जमातीसाठीराखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात महिलांना एकूण ६१ ठिकाणी आरक्षणानुसार संधी मिळणार आहे. महिलांना पन्नास टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित करु नये असे निर्देश असल्याने निवडणुका पार पडल्यावर नवी मुंबइ महापालिकेत महिला राज दिसणार आहे. अनेक प्रभागात श्रीमान-श्रीमती जोडीने महापालिका मध्ये निवडून येण्याची शक्यता आहे.

यापूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणानुसार संभाव्य उमेदवार आणि राजकीयपक्षांनी आपली रणनीती आखली होती. मात्र, आता ओबीसी आरक्षणामुळे संभाव्य उमेदवारांचे राजकीय समीकरण बदलणार आहे. तरीही नवी मुंबई महापालिका निवडणूक बहुसदस्यीय पध्दतीने होणार असल्याने पडलेल्या आरक्षणाचा फटका कुणालाही बसलेला नाही. पुरुष किंवा महिला यापैकी कुणीही असलेल्या नगरसेवकांच्या घरातील एक प्रतिनिधीला निवडणूक लढता येणार आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

जाहिरात फलकांसाठी झाडांवर खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी