दिवाळे गावात ‘स्मार्ट व्हिलेज'चा दुसरा टप्पा सुरु

बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गावचा विकास 

नवी मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशातील गावांचे ‘स्मार्ट व्हिलेज'चे स्वप्न तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजना अंतर्गत ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गावचा विकास करण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन ना. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात होण्यापूर्वी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी २६ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर २७ जुलै रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘स्मार्ट दिवाळे गाव'च्या विकासाचे प्रेसेंटेशन सादर केले.

याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, महापालिका शहर अभियंता संजय देसाई, सहाय्यक आयुक्त तथा बेलापूर विभाग अधिकारी मिताली संचेती तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट व्हिलेज अंतर्गत दिवाळे गावामध्ये दुसऱ्या टप्प्यात समाजपयोगी बहुउद्देशीय इमारत, सुसज्ज भाजी मार्केट, अत्याधुनिक लायब्ररी, तरुणांसाठी व्यायामशाळा इमारत, बँड पथकाकरिता प्रशिक्षण केंद्र, लहान मुलांकरिता खेळणी घर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, गजेबो गार्डन, संगणक प्रशिक्षण केंद्र, सोलर सिस्टम उभारणे, खेळण्याकरिता मैदान, मध्यवर्ती मार्ग, समुद्रकिनारी फिरण्यासाठी रस्ता, जॉगिंग ट्रक, भव्य उद्यान, संपूर्ण गावाच्या सभोवताली रिंग रोड, लग्न कार्यासाठी स्टेज, प्रसाधनगृहे, रिक्षा चालकांसाठी कार्यालय उभारण्यात येणार आहेत. एकंदरीतच ‘स्मार्ट व्हिलेज'च्या दिशेने जलद वाटचाल होत असल्याने दिवाळे गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वच स्तरातून अशा प्रकल्पाचे स्वागत होत आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच सानपाडा येथील नियोजित सेंट्रल लायब्ररी, बेलापूर विभागात बुध्द विहार उभारणे, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घेणे, दिवाळे ग्रामस्थांना आलेल्या वाढीव मालमत्ता कर कमी करणे, बोनकोडे ग्रामस्थांना दशक्रिया विधीसाठी खाडीकिनारी शेड उभारणे अशा विविध विषयांवरही यावेळी आयुवत अभिजीत बांगर यांच्यासोबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता
प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज तयार करावे, असे स्वप्न बाळगले आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून दिवाळे गावाच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कोटींची तरतूद करण्यात आलेली असून आता दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेज म्हणून वाटचाल करीत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असून चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा देखील मिळणार आहेत. स्वच्छता आणि सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार असून सदर प्रकल्प माझा पायलट प्रोजेक्ट असून त्याच धर्तीवर बेलापूर मतदारसंघातील इतर गावेही स्मार्ट व्हिलेज म्हणून उदयास येणार आहेत. -आमदार सौ.मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

केंद्र सरकार कडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न -  नाना पटोले