मला दुसऱ्याचा पक्ष फोडून माझा पक्ष वाढवायचा नाही - अमित ठाकरे

नवी मुंबई -:महाविद्यालयीन तरुणांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्याच्या भेटीगाठीवर अधिक भर दिला जाणार आहे. तर राज्यातील विद्यार्थी वर्गाशी संवाद साधत असताना मनसेचे ज्येष्ठ नेते जनतेशी संवाद साधतील असे मत महाराष्ट्र नवनर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यानी केले. मनसे विद्यार्थी सेनेतर्फे वाशीत महासंपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांसोबत अनौपचारिक वार्तालाप करताना बोलत होते.

शिवसेना फुटीचा फायदा मनसेला होतोय का असा प्रश्न ठाकरे यांना  विचारण्यात आला. दुसऱ्यांचा पक्ष फोडून मला माझा पक्ष वाढवायचा नाही असे थेट अमित ठाकरे यांनी उत्तर दिले. तर दुसऱ्या पक्षाबद्दल आम्ही काही बोलणार नाही असे मत मांडत राज्यातील सध्याच्या घडामोडींवर बोलणे त्यांनी टाळले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील नेहमी दुसऱ्या पक्षातील नेता घेण्यापेक्षा मी माझ्या पक्षातील नेता निर्माण करेल असे सांगत असतात आज त्यांच्याच विचारांची छाप त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विचारात पहायला मिळाली. वाशीतील गुरव ज्ञाति हॉल येथे अमित ठाकरे  यांनी मनविसेत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयीन तरुण तरुणींशी थेट संवाद साधला. यावेळी नवी मुंबईतील प्रमुख मनसे नेत्यांसह  मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुण  तरुणी उपस्थित होते.

बाईक रॅली द्वारे अमित ठाकरे यांचे स्वागत

नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी करिता मनविसेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित ठाकरे हे वाशीत येणार होते. त्यानिमित्ताने विद्यार्थी सेने तर्फे वाशी टोल नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत अशी बाईक रॅली काढून अमित ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

माजी आमदार संदीप नाईक यांची सदिच्छा भेट 

नवी मुंबईतील भाजप आमदार  गणेश नाईक यांचे सुपुत्र, माजी आमदार संदीप गणेश नाईक यांनी आज मनसे नेते  अमित ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर  सागर नाईक हे सुद्धा उपस्थित होते. संदीप नाईक यांच्या कार्यालयात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे त्यांनी चर्चा केली. मात्र या चर्चेचा तपशील उघड करण्यास मनसेच्या नेत्यांनी नकार दिला. फक्त चहा घेवून अमित ठाकरे परत दौऱ्यावर गेल्याची पुष्टी जोडली. मात्र सदर भेटीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे भाजप युती बाबतच्या चर्चाना पुन्हा एकदा उधाण आले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट 10 आमदारांमध्ये प्रशांत ठाकूर यांचा समावेश