उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या वाड्याचे लोकार्पण

पनवेल :  भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव असलेल्या पनवेल तालुक्यातील शिरढोण येेथील त्यांच्या नूतनीकृत वाड्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड उपमुख्यमंत्र्यांसमवेत होते.

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असंतोष तयार केला. सशक्त क्रांतीचे बिजारोपण केलेे. त्यांच्या वाड्याच्या नूतनीकरणासाठी आपले सरकार असताना निधी मिळाला होता आणि त्याचे आज लोकार्पण होतेय हे मी भाग्य समजतो, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
येथील ग्रामपंचायतींकरिता ज्या काही योजना आपल्या मनात आहेत त्याकरिता एमएमआरडीएचा निधी देण्यासाठी मी प्रयत्न करेन. गावे चांगली व्हावीत तसेच ग्रामस्थांच्या आशा-आकांशा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या वेळी त्यांनी फडके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून वनवासी बांधवांसाठी फिरता दवाखाना उपलब्ध करून देण्यात आला असून या दवाखान्याचे उद्घाटन या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमास तहसीलदार विजय तळेकर, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, भाजप नेते विनोद साबळे, माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, शिरढोण ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना कातकरी, उपसरपंच रेश्मा वाजेकर, माजी सरपंच गजानन घरत, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, विजय भोपी, ग्रामपंचायत सदस्य संगीता चौधरी, मोनाली घरत, निकिता चौधरी, सानिका कातकरी, सुदाबाई माळी, माजी सदस्य प्रमोद कर्णेकर, सांगुर्ली ग्रामपंचायतीच्या सदस्य सुवर्णा पाटील, माजी सरपंच दत्तात्रेय हातमोडे, साधना वाजेकर, पळस्पे ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील गवंडी, विजय गवंडी, प्रतीक भोईर, शरद वांगिलकर, मंदार जोग, भाजप गाव अध्यक्ष नितेश मुकादम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मला दुसऱ्याचा पक्ष फोडून माझा पक्ष वाढवायचा नाही - अमित ठाकरे