जीएसटी विरोधात वंचित बहुजन आघाडीचे वाशीतील शिवाजी चौकात निषेध आंदोलन  

नवी मुंबई : केंद्र सरकारने करमुक्त असलेल्या सर्वसामान्यांच्या वापरातील वस्तू, डेअरी, कृषी उत्पादने यावर जीएसटी लादण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाईत वाढ होणार आहे. त्यामुळे अवाजवी करण्यात आलेली ही दरवाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहूजन आघाडी नवी मुंबईच्या वतीने शनिवारी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले तसेच केंद्र सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला.  


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने नुकतेच दूध, दही आणि पनीर सारख्या पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांना 5 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच तांदूळ आणि गहू यांसारख्या अनपॅक केलेल्या वस्तूंनाही 5 टक्के कराच्या कक्षेत आणण्यात आले आहे. आतापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारने अनब्रँडेड जीवनावश्यक खाद्यपदार्थावर 5 टक्के वस्तू व सेवा कर लावण्याचा निर्णय घेतला असून संपूर्ण देशात जीएसटीचा निर्णय 18 जुलै पासून लागू करण्यात आला आहे.  


या निर्णयाला देशभरातील व्यापारांकडून कडाडून विरोध करण्यात येत असून वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या निर्णयाचा विरोध करुन त्याविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष भूषण कासारे, नवी मुंबई जिल्हा महासचिव अश्वजित जगताप जिल्हा महिला अध्यक्षा शिल्पा रणदिवे, उपाध्यक्ष गौतम चव्हाण, दीपक बणाईत, महिला महासचिव साक्षी लोटे, ऐरोली तालुका महासचिव विश्वास गांगुर्डे, गायकवाड, ऍड.अरुण सावंत, ऍड.पंकज वाघमारे, ऍड.गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात आंदोलन करण्यात आले.


 देशात प्रचंड महागाई असताना सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या आणि दैनिक वापराच्या वस्तू जीएसटी कक्षात आणून केंद्र सरकारने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा जाहीर निषेध केला. तसेच सरकारने केलेली ही दरवाढ अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करत ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निषेध आंदोलनात प्रा.व्यंकट माने, बाळासाहेब डोळस, दत्ता कांबळे, सिमा बनसोडे, सिद्धू गायकवाड, हेमंत बनसोडे, कल्याण हनुवटे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.  

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या वाड्याचे लोकार्पण