खाडीकिनारी भागातील संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन

संशयित वस्तू, व्यक्तींची माहिती देणाऱया मच्छिमारांचा पोलीस उपआयुक्त रुपाली अंबुरे यांच्या हस्ते सत्कार

नवी मुंबई : सागर रक्षक दल, ग्रामरक्षक दल, मच्छिमार हे सागरी सुरक्षेचे डोळे व कान असून त्यांनी सागरी सुरक्षेच्या संदर्भात सतर्क राहून सागरी, खाडी किनारी भागातील संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून सदरची माहिती तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात दिल्यास पोलिसांना पुढील योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोईचे होईल. त्यामुळे  सागर सरक्ष दल, ग्रामरक्षक दल व मच्छिमारांनी पोलिसांना संशयास्पद हालचालींची तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्त रुपाली अंबुरे यांनी केले.  

सागरी मार्गाने होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातंर्गत सागरी सुरक्षा शाखेकडून शुक्रवारी सायंकाळी उलवे येथील जेट्टीवर सागर रक्षक दल सदस्य व मच्छिमारांसाठी सागरी सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती अभियानाच्या अध्यक्ष म्हणून विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्त रुपाली अंबुरे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित सागर रक्षक दलाचे सदस्य व मच्छिमार यांच्याशी संवाद साधताना नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातर्फे सागरी सुरक्षेसंदर्भात सुरु करण्यात आलेल्या कोस्टल हेल्पलाईन क्रमांक 1093 ची उपस्थितांना माहिती देऊन सदर हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन केले. 

सद्यस्थितीत पावसाळी कालावधीमुळे मासेमारी करणाऱया नौकांचे समुद्रात जाणे बंद असल्याने समुद्रात काही संशयास्पद हालचाली झाल्यास त्याबाबत तत्काळ माहिती मिळणे शक्य होत नाही. सागरी सुरक्षिततेचा सागरी मार्गाने होणारा संभाव्य धोका लक्षात घेता समुद्रकिनारी व खाडी किनारी भागातील गावांमधून सागरी सुरक्षिततेबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याने खाडी किनारी असलेल्या ग्रास्थांमध्ये सागरी सुरक्षा संदर्भात जनजागृती करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.  

यावेळी सागरी सुरक्षा शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे, मत्स्य विकास अधिकारी सुरेश बाबुलगावे सागरी किनारी गावातील 150 सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार बांधव तसेच विविध कार्यकारी मच्छिमार सहकार सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते. या अभियानामध्ये सागरी सुरक्षा संदर्भातील सागरी, खाडी किनारी भागात मिळून आलेल्या संशयित वस्तू, नौका व व्यक्तींची तत्काळ माहिती पोलिसांना देणा-या मच्छिमार बांधवांचा पोलीस उप आयुक्त रुपाली अंबुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई पोलीस दलात रॅम्बो दाखल....