नवी मुंबई पोलीस दलात रॅम्बो दाखल....

नवी मुंबई : पोलिसांच्या फौजफाटयातील सर्वात महत्त्वाचा आणि आपत्कालीन परिस्थितीत भक्कम आधार असलेला विभाग म्हणजे (बीडीडीएस) बॉम्बशोधक आणि नाशक पथक, त्यातही केवळ हुंगून बॉम्ब शोधणारे श्वान म्हणजेच स्निफर डॉग हे पोलिसांचे हुकुमी एक्के. विविध प्रकारच्या गुह्यांची उकल करण्यासाठी अथवा बॉम्ब, स्फोटके यासारख्या वस्तु शोधण्यासाठी पोलिसांचे श्वान नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. श्वानांचे हे महत्व लक्षात घेऊनच प्रत्येक पोलीस दलात प्रशिक्षीत श्वान पथकाची नेमणुक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस दलातील श्वान पथकाचा नवी मुंबई पोलिसांना मोठा आधार आहे. त्यामुळे या श्वान पथकाला अधिक भक्कम करण्यासाठी आणखी एका नव्या श्वानाला पोलीस दलात सामील करण्यात आले आहे..... या श्वानाचे नाव आहे रॅम्बो....


रॅम्बो सध्या अडीच महिन्यांचा असून नुकतेच त्याला नवी मुंबई पोलीस दलात घेण्यात आले असले तरी, 6 महिन्यानंतर त्याच्या ट्रेनिंगला सुरुवात होणार आहे. पुणे, मध्यप्रदेश, अथवा राजस्थान यापैकी एका ठिकाणी पुणे सीआयडीकडुन आलेल्या आदेशानुसार रॅम्बोला व त्याच्या हॅन्डलरला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. अस्सल लॅब्रेडोर जातीचा व शांत स्वभावाचा असलेला रॅम्बो हा मुळचा नाशिक येथील असला तरी, खारघरमधून त्याला विकत घेण्यात आले आहे. प्रशिक्षणानंतर रॅम्बो हा पोलिसी सेवेत रीतसर दाखल होणार आहे.  
नवी मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकात सध्या जॅक आणि सिम्बा हे 2 श्वान कार्यरत असून त्यापैकी सिम्बा याचे कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात ट्रेनिंग सुरु आहे. डिसेंबर 2017 मध्ये नवी मुंबई पोलीस दलातील विरु या श्वानाचे निधन झाल्याने रिक्त असलेल्या त्याच्या जागेवर रॅम्बोला घेण्यात आले आहे. सध्या रॅम्बोला सांभाळण्याची जबाबदारी पोलीस नाईक मंगेश सावंत आणि मंदार पाटील या दोन हॅन्डलर्सना देण्यात आल्याची माहिती बीडीडीएस पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी दिली.  
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बेवारस बॅगेत बॉम्ब असल्याचे अथवा बॉम्ब ठेवण्यात आल्याचे वर्षभरत सरासरी 8 ते 10 कॉल येत असतात, त्यामुळे अशा ठिकाणी श्वान पथकाला धाव घ्यावीच लागते. मात्र, शहरात होणा-या मोठया राजकिय सभा, आयपीएल मॅचेस, व्हिआयपींच्या वाहनांची सुरक्षा अशा तपासण्यांच्या मोहिमेवर श्वान पथकाला नेहमीच सक्रिय राहावे लागते. त्याशिवाय श्वान पथकाकडुन गर्दीच्या ठिकाणी, मॉल, रेल्वे स्टेशन, महत्वाची ठिकाणे, विविध शासकीय इमारतीं आदी ठिकाणी नियमित तपासणी करावी लागते.  
विविध प्रकारच्या गुह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांचे श्वान महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे दुपार असो की मध्यरात्र कॉल आला की त्याकडे धाव घ्यायची, हाच विचार या विभागातील कर्मचाऱयांच्या मनात असतो. त्यामुळे कमालीचा ताण असलेल्या या श्वानांच्या दिनचर्येची काळजी घेण्याची सर्वस्वी जबाबदारी त्याच्या हँडलरवर येत असल्याचे विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्त रुपाली अंबुरे यांनी सांगितले.  


श्वानाची निवड  
कुत्र्याचे सरासरी वय हे 10 ते 15 वर्षे असते. कुत्र्याची घ्राणेंद्रिये ही मनुष्याच्या तुलनेत 20 ते 40 टक्के तीक्ष्ण असतात. त्यामुळेच बॉम्ब, ड्रग्ज, आरोपी यांच्या शोधात कुत्र्यासारखा मित्र पोलिसांना नाही. बॉम्बशोधक पथकासाठी खास करुन लॅब्रेडोर जातीच्या कुत्र्यांची निवड केली जाते, ती त्याच्या शांत स्वभावामुळे. दोन ते अडीच महिन्यांचे असतानाच या कुत्र्यांच्या पिल्लांची निवड केली जाते. केवळ अस्सल जातीच्या लॅब्रेडोर कुत्र्यांच्या पिल्लांची निगा राखणा-या ब्रीडरकडून या पिल्लांची निवड केली जाते. पोलिस दलातील निष्णात हँडलर या पिल्लांची तपासणी करुनच त्याला सेवेत घेण्याविषयी अंतिम निर्णय घेतात.  


पोलिस दलात एका श्वानाला दोन हँडलर सांभाळतात. जेणे करुन दोन्ही पाळ्यांमध्ये श्वानासोबत त्यांचा विश्वासू हँडलर असावा. काही महिन्यांची ओळख झाली की पिल्लाची आणि त्याच्या सोबत हँडलरची रवानगी श्वान प्रशिक्षण केंद्रात केली जाते. या केंद्रात पहिले तीन महिने केवळ शिस्तीचे धडे देण्यात येतात. त्यानंतर पुढील तीन महिने बॉम्ब कसा ओळखावा, तो कसा शोधावा आणि तो मिळाल्यानंतर आपल्या हँडलरला कसे सांगावे याचे प्रशिक्षण देण्यात येते. या कालावधीत पिल्लाचे हँडलर त्यांच्या सोबतच असतात. प्रशिक्षणानंतर श्वान पोलिसी सेवेत रीतसर दाखल होतो. त्याच्या राहण्याची खोली, त्याचा आहार आणि निगा राखण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्या हँडलरवर असते.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरखैरणे रेल्वे स्थानकात झोपलेल्या दोघा तरुणांना मारहाण करुन लुटले