पनवेलमधून कट्टर शिवसैनिकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा 

पनवेल :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला हादरा देत वेगळ्या गटाची स्थापना केली तेव्हापासून एकनाथ शिंदे यांना राज्यभरातून आणि विविध स्तरातून समर्थन मिळत आहे. पनवेलमध्येही काल मोठ्या प्रमाणावर याची सुरुवात झालेली पहावयास मिळाली. पनवेल महानगर क्षेत्राचे संघटक तथा माजी नगरसेवक ऍडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी आपल्या ४०० ते ५०० समर्थक कार्यकर्ते व काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत यापुढे शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचे निश्चित केले. 

      पनवेल मधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर सोमण यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आज पर्यंत मोठा संघर्ष केला आहे. शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमण कुटुंबीयांतील प्रथमेश सोमण यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने निश्चितच हा पनवेल शिवसेनेला एक धक्का मानला जात आहे. प्रथमेश सोमण यांनी ही तरुण वयात नगरसेवक म्हणून व त्यानंतर शहर प्रमुख व महानगर संघटक अशा विविध पदांवर अनेक सामाजिक प्रश्न हाताळले असून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. काल झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांनी प्रथमेश सोमण यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल द्वारे प्रसिद्ध केली. सदर कार्यक्रमात सोमण यांच्यासह विभागप्रमुख प्रसाद सोनवणे, शाखाप्रमुख अर्जुन परदेशी, अभिजीत साखरे, युवासेना शहर सचिव अभिनय सोमण, शाखाप्रमुख रमेश बेद,  दर्यासागर पतपेढीचे संचालक गणेश वाघिलकर, गटप्रमुख नंदकुमार, शिवसेना प्रणित शिवप्रेरणा श्रमिक कामगार सेनेशी संलग्न सर्व पदाधिकारी - कामगार सदस्य, पाली- देवद विचुंबे येथील शिवसैनिक व शिवनगर रहिवास संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला उपजिल्हा संघटिका सीमा मानकामे, शाखाप्रमुख यतीन मानकामे, उसरली खुर्द विकास मंच चे कार्यकर्ते, कामोठे परिसरातील विभाग प्रमुख शरद निकम डॉक्टर वडगावकर ज्येष्ठ महिला पदाधिकारी सुलक्षणा जगदाळे, आशिष पनवेलकर यासह शेकडो कार्यकर्ते व शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले, ठाणेचे माजी महापौर नरेश म्हस्के, नविन पनवेल शहर प्रमुख रुपेश ठोंबरे आदी उपस्थित होते. "पनवेल मधील जवळजवळ सर्वच उर्वरित पदाधिकाऱ्यांनी माझ्या भूमिकेचे स्वागत केले असून मला पाठिंबा दिला आहे. तसेच येणाऱ्या काळात आमच्या संपर्कात असणारे अनेक पदाधिकारी शिंदे साहेबांना समर्थन देतील" असा विश्वास प्रथमेश सोमण यांनी व्यक्त केला

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिका निवडणुकीत ओबीसींचा मार्ग मोकळा