महापालिका निवडणुकीत ओबीसींचा मार्ग मोकळा 

नवी मुंबई महापालिकेत किमान २२ ओबीसी उमेदवारांची वर्णी लागणार  

नवी मुंबई : बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार आगामी महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखविल्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी उमेदवारांचा जीव भांडयात पडला आहे. त्यामुळे आगामी नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत नवी मुंबई महापालिका सभागृहात ओबीसींचे महिला-पुरुष मिळून 22 नगरसेवक दाखल होणार आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून ओबीसींचे आरक्षण व प्रभाग रचनेबाबत अद्यापपर्यंत कोणतेही लेखी आदेश नवी मुंबई महापालिकेला प्राप्त झाले नसून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणासंदर्भात कार्यवाही केली जाईल असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले.  

करोना आपत्तीमुळे सुमारे अडीच वर्षापासून नवी मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरु आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार ओबीसींच्या आरक्षणाविना निवडणूका घेण्याची तयारी आयोगाच्या निर्देशानुसार  मुदत संपलेल्या महापालिकांनी सुरु केली होती. त्यानुसार प्रभागरचना, प्रभाग आरक्षण, मतदार यादी अद्ययावत करण्याचे नवी मुंबई महापालिकेचे काम पुर्ण झाले आहे.  

दरम्यान, ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने बांठिया आयोगाने सादर केलेला शिफारशींचा अहवाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सदर शिफारशींचा स्विकार करत ओबीसी आरक्षणासहीत महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगास दिले होते.  

बांठिया आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील ओबीसींची एकूण टक्केवारी गृहित धरुन 20.5 टक्के ओबीसींकरीता आरक्षण देण्याबाबत शिफारस केली आहे. 

राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महापालिका निवडणूका त्रिसदस्यीय पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने नव्याने प्रभाग रचना केली असता यात नव्याने 11 प्रभागांची वाढ झाली. त्यामुळे भविष्यात नवी मुंबई महापालिका सभागृहात 122 नगरसेवकांची संख्या असणार आहे. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यासाठी आरक्षण सोडत गत मार्च महिन्यात पार पडली. यात अनुसूचित जाती-11, अनुसूचित जमाती-2 आणि सर्वसाधारण- 109 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. यात अनुसूचित जाती महिला-6 व अनुसूचित जमाती महिला-1 आणि सर्वसाधारण महिला-54 असे एकुण- 61 प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.  

बांठिया आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे नवी मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून 22 ओबीसी महिला-पुरुषांचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबई महापालिकेत आरक्षित असलेल्या सर्वसाधारण-109 प्रभागापैकी ओबीसींना 20.5 टक्के आरक्षण दिल्यास 22 प्रभाग ओबीसींकरिता आरक्षित राहणार असल्याने, नवी मुंबई महापालिका सभागृहात ओबीसी नगरसेवकांची संख्या देखील निर्णायक ठरणार आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेलमध्ये शनिवारी भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक