वाहतुक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन अर्धा किलोमीटर फरफटत नेणारा कार चालक पोलिसांच्या ताब्यात 

ताे कारचालक अटकेत

नवी मुंबई : खारघर येथील कोपरागाव ब्रीजजवळ विरुद्ध दिशेने येणा-या कारला थांबविण्याचा प्रयत्न करणा-या वाहतूक पोलिसाच्या अंगावर एका कार चालकाने गाडी घातल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. यावेळी सतर्क वाहतुक पोलिसाने स्वत:ला वाचविण्यासाठी सदर कारचे बोनेट पकडल्याने कार चालकाने आपली कार न थांबवता वाहतूक पोलिसाला आपल्या कारच्या बोनटवरुन अर्धा किलोमीटर फरफटत नेले. या प्रकारानंतर इतर वाहतूक पोलीसांनी या कारचा पाठलाग करुन सदर कारला अडविल्यानंतर  कारच्या बोनेटवर असलेल्या वाहतुक पोलिसाची सुटका केली. त्यानंतर त्यांनी सदर कार चालकाला पुढील कारवाईसाठी खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा सर्व घटनाक्रम काही वाहन चालकांनी आपल्या मोबाईलवर चित्रित केला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.  

या घटनेतील कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलेले वाहतुक पोलीस पोलीस कॉन्स्टेबल गादेकर हे खारघर वाहतुक शाखेत कार्यरत असून शनिवारी सकाळी त्यांना कोपरा ब्रीज येथील रस्त्यावर विरुध्द येणा-या वाहनावर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आले होते. यावेळी कोपरा गाव सेक्टर-10 कडून विरुध्द दिशेने येणा-या आकाश महेश जांगीड (35) याच्या हुंडाई कारला (एमएच-46 झेड-6296) थांबविण्यासाठी कारसमोर गेले. यावेळी आकाश जांगड याने आपली कार न थांबवता वाहतुक पोलीस गादेकर यांच्या अंगावर कार घातली. यावेळी वाहतुक पोलीस गादेकर यांनी स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करत सदर कारचे बोनेट पकडले. यावेळी कार चालक आकाश जांगीड याने आपली कार त्याठिकाणी न थांबवता, गादेकर यांना आपल्या कारच्या बोनेटवर लटकलेल्या अवस्थेत ठेवून आपली कार डिमार्टकडे जाणा-या रस्त्यावर भरधाव वेगात अर्धा किलोमीटर पर्यंत नेली.  

यावेळी वाहतुक पोलीस नाईक निवृती भोईर यांनी सदर कारचा पाठलाग करुन इनोव्हा कार चालकाच्या मदतीने सदरची कार थांबविली. त्यानंतर कारच्या बोनेटवर लटकलेले वातहुक पोलीस गादेकर खाली उतरल्यानंतर वाहतुक पोलिसांनी कार चालक आकाश जांगीड याला कारसह ताब्यात घेऊन त्याला खारघर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर खारघर पोलिसांनी आरोपी आकाश जांगीड याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेलले आहे. दरम्यान, पनवेल मधील लाईफ लाईन हॉस्पिटलमधील डॉ.जानवी पाटील यांनी या घटनाक्रमाचा संपुर्ण व्हिडीओ आपल्या मोबाईलवरुन काढला असून हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पामबीच मार्गावर होंडासिटी कारला अपघात