खंडणीसाठी सहकामगाराच्या मुलाचे अपहरण करणारा खंडणीखोर पोलिसांच्या जाळ्यात

11 वर्षीय मुलाचे अपहरण 30 हजार रुपयांच्या मागणी करणा-या खंडणीखोराला अटक

नवी मुंबई : पनवेल भागात राहणाऱया कामगाराच्या 11 वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याच्याकडे 30 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱया सैबुद्दीन आलम (35) या खंडणीखोराला ठाण्यातील नारपोली पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. तसेच त्याच्या ताब्यातून अपह्रत मुलाची सुटका करुन त्याला पालकांच्या स्वाधीन केल आहे. त्याचप्रमाणे आरोपीला पुढील कारवाईसाठी पनवले शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अपह्रत मुलाच्या पित्याने केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर दिला नसल्याने आरोपीने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  

या घटनेतील आरोपी सैबुद्दीन आलम हा तक्रारदारासोबत पनवेल भागात मिस्त्री काम करत होता. आरोपी सैबुद्दीन आलम याने दहा दिवस काम केल्यानंतर देखील तक्रारदाराने त्याला कामाचा मोबदला दिला नव्हता. त्यामुळे रागाच्या भरात आरोपी सैबुद्दीन याने गत 1 जुलै रोजी तक्रारदार आपल्या कामावर गेला असताना, त्याच्या 11 वर्षीय मुलाला खाण्यास देण्याच्या बहाण्याने सोबत नेऊन त्याचे अपहरण केले होते. दुपारी तक्रारदार घरी जेवण्यासाठी आल्यानंतर त्याला घरात मुलगा निदर्शनास न आल्याने त्याने मुलाची शोधा-शोध सुरु केल्यानंतर त्याच्या मुलाचे आरोपी सैबुद्दीन याने अपहरण केल्याची माहिती त्याला मिळाली.  

यावेळी तक्रारदाराने आरोपी सैबुद्दीन याला मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर त्याने 8 हजार रुपये दिल्यास त्याच्या मुलाला परत देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने त्याला 4 हजार रुपये पाठवुन दिले. मात्र त्यानंतर आरोपी सैबुद्दीन याने तक्रारदाराकडे आणखी 30 हजार रुपयांची मागणी केली. अन्यथा त्याच्या मुलाला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारदाराने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करुन याचा शोध सुरु केला होता.  

या तपासात आरोपी हा नारपोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिवंडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी नारपोली पोलिसांना आरोपी सैबुद्दीनच्या लोकेशनची माहिती दिल्यानंतर नारपोली पोलिसांनी त्याचा भिवंडी परिसरात शोध घेतला असता, आरोपी सैबुद्दीन हा त्याच्या बहिणीच्या घरी अपह्रत मुलासोबत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नारपोली पोलिसांनी आरोपी सैबुद्दीन याला व अपह्रत मुलाला ताब्यात घेऊन दोघांना पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाहतुक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन अर्धा किलोमीटर फरफटत नेणारा कार चालक पोलिसांच्या ताब्यात