महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
भरारी पथकाद्वारे स्कूल बस नियमावलीची चाचपणी करण्याची मागणी
शासनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या स्कूल बसवर कारवाई करा
नवी मुंबई - स्कुल बसेसच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. नवी मुंबईतील स्कुल बसेसची पुन्हा नव्याने चाचपणी करून शासनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या बसेसवर कारवाई करण्याची मागणी मनविसे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी महापालिकेचे शिक्षण उपायुक्त जयदीप पवार तसेच आरटीओचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
गेली दोन वर्षे कोरोना या संसर्गामुळे नवी मुंबईतील शाळा या बंद होत्या. मात्र आता कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. शाळेशी संबंधित अनेक गोष्टी देखील सुरू झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. यापैकी एक म्हणजे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी स्कुल बस आहे. कोरोना काळात या स्कुल बसेस जवळपास दोन वर्षे एकाच ठिकाणी उभ्या होत्या. त्यामुळे सर्व प्रथम या स्कुल बसेसची फिटनेस तपासून पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. खाजगी कंत्राटदारा मार्फ़त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कुल बसेसच्या फिटनेस सर्टिफिकेट बऱ्याचदा बोगस असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे स्कुल बसेसच्या छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना आपला जीव नाहक गमवावा लागला आहे. भविष्यात अश्या दुर्घटना टाळायच्या असतील तर महाराष्ट्र शासनाने २०११ रोजी घालुन दिलेल्या स्कूल बस नियमावलीचे पालन तंतोतंत होते की नाही ह्याची चाचपणी प्रशासना मार्फ़त होणे अत्यंत गरजेचे असल्याचे संदेश डोंगरे यांनी पत्रात म्हटले आहे. ह्यात प्रामुख्याने बसची यांत्रिक स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे.
नियमानुसार बस १५ वर्षापेक्षा अधिक जुनी नसावी. स्कूल बस पिवळ्या रंगाची असावी. त्याचबरोबर त्यावर दोन्ही बाजूच्या खिडक्याखाली चॉकलेटी रंगाचा पट्टा असावा. त्यावर शाळेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक असावा. एकापेक्षा अधिक स्कूल बस एका शाळेच्या असल्यास त्यावर क्रमांक पुढील भागात ठळकपणे असावा. बसमध्ये विद्यार्थ्यांना सहजच चढता उतरता येईल अशा पायऱ्या असाव्यात. खिडक्यांमध्ये तीन आडव्या दांड्या असाव्यात. त्याचबरोबर बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व विद्यार्थ्यांच्या नावाची यादी, पत्ता आदी तपशील असलेली पुस्तिका असावी. प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी व अग्निशामक यंत्रणा असावी. बसमधील चालकास किमान पाच वर्षे बस चालवण्याचा अनुभव असावा. त्याच्यावर कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नसावा. त्याचे चारित्र्य पडताळणी पत्र असणे बंधनकारक असल्याने त्याची देखील पूर्तता करून घ्यावी. बसमध्ये महिला सहाय्यक असावी. चालक व सहाय्यक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्याच बरोबर अंत्यत महत्वाचे म्हणजे बसमध्ये जी पी एस यंत्रणा लावणे या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्याकरिता शाळेत परिवहन समिती नेमावी त्या समितीची तीन महिन्यातून एकदा बैठक असणे गरजेचे आहे. ह्या प्रामुख्याने स्कूल बस नियमावलीतील गोष्टींची पूर्तता होणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव गरजेचे आहे. तरच भविष्यातील दुर्घटना टाळता येऊ शकतील म्हणून प्रशासनाने गांभीर्याने ह्याचा विचार करून स्कूल बस नियमावलीची अंमलबजावणी न करणाऱ्या कंत्राटदारावर आताच योग्य ती कारवाई करून चाप लावावी अशी मागणी संदेश डोंगरे यांनी पत्रातून केली आहे. त्याकरिता महापालिकेने भरारी पथक नेमून शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि आरटीओ यांनी संयुक्तरीत्या धडक देऊन कारवाई करणे देखील अपेक्षित असल्याचे संदेश डोंगरे यांनी पत्रात सांगितले. त्यांनतर यापुढे नवी मुंबईत मनविसेला नियम धाब्यावर बसवून स्कूल बस फिरताना दिसल्यास मनविसे आपल्या 'मनसे स्टाईल' ने आंदोलन करण्याचा इशारा संदेश डोंगरे यांनी प्रशासनाला दिला. पुढील आठवड्यात महापालिका शिक्षण विभाग तसेच आरटीओ प्रशासन यांची संयुक्त बैठक बोलावून शासनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या स्कुल बसेस वर कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी जयदीप पवार यांनी मनविसेच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले. यावेळी वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष नितिन खानविलकर, मनविसे उपशहर अध्यक्ष दशरथ सूरवसे, प्रशांत पाटेकर, शहर सचिव समृद्ध भोपी, प्रतिक खेड़ेकर, गणेश भोसले उपस्थित होते