काही वर्षामध्ये पनवेल व खारघर मधील धबधब्यांवर अनेक दुर्घटना

पावसाळ्यात धबधब्याजवळ न जाण्याचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांचे आवाहन   

नवी मुंबई : पावसळ्यात पनवेल व खारघर मधील धबधब्यांवर व धरणांवर दुर्घटना घडत असल्याने या धबधब्यांवर व धरणावर जाण्यासाठी पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात धबधब्याजवळ जाऊ नये, असे आवाहन परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे.  

महाराष्ट्रात सध्या पावसाने जोर धरला असला तरी खरा पाऊस जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थीतीत अनेकवेळा लोकं विशेषत: तरुण पनवेल व खारघर भागातील धबधबा व धरणाजवळ मौज-मजा करण्यासाठी जात असतात. मात्र सदर ठिकाणी दुर्घटना होऊन आपला जीव गमावुन बसतात. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा धबधब्याच्या पाण्यात प्रचंड वाढ होते. अशा परिस्थीतीत अनेक तरुण नशा करुन धबधब्याखाली जातात आणि आपला जीव गमावतात. गेल्या काही वर्षामध्ये पनवेल व खारघर मधील धबधब्यांवर अशा अनेक घटना घडल्या आहेत.  

खारघर व्यतिरिक्त पनवेलमध्ये अनेक छोटे-छोटे धबधबे व धरण आहेत. या धबधब्यावर मौज मजा करण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात मोठÎा संख्येने पर्यटक जात असतात, त्यामुळे या धबधब्यांचे मुख्य रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी अनेक तरुण दुसऱया मार्गाने डोंगराळ भागातून धबधब्याजवळ जात असतात. अनेक वेळा काही तरुण दिवसा उजेडात जातात, त्यानंतर ते रात्रीच्या अंधारात हरवून जातात. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना जावे लागते. त्यामुळे सर्व धबधब्याच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले असून धबधब्याजवळ लोकं पोहोचू शकतील अशा सर्व मार्गांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. जर कोणी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात धबधब्यावर जाऊ नये असे आवाहन पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे.  

खारघरमधील पांडव कडा या धबधब्यावर दरवर्षी काही ना काही दुर्घटना घडत असते. त्यामुळे प्रशासनाकडुन या धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आले आहे. असे असतानाही गतवर्षी अनेक महिला व लहान मुले जंगलाच्या वाटने खारघर मधील धबधब्यावर गेले होते. त्यावेळी अचानक पावसाचा जोर वाढल्यानंतर येथील धबधब्यावर अनेक महिला व लहान मुले अडकून पडली होती. त्यानंतर पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करुन त्यांची सुटका केली होती.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

'स्कूल व्हॅन'ने  घेतला अचानक पेट