अमली पदार्थांची खुलेआम विक्री ; तरुणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात

कोपरखैरणे पोलिसांचे अमली पदार्थांची खुलेआम विक्रीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त

नवी मुंबई -: कोपरखैरणे विभागात मागील एक वर्षापासून अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने तरुणाई या अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालली आहे. तसेच या साऱ्या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोपरखैरणे विभागाला नशा मुक्त करावे म्हणून नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने  मंगळवारी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले.

कोपरखैरणे विभागात एक वर्षापासुन खुलेआम विक्री होत आहे.  सेक्टर १९, कोपरखैरणे गांव, तलावाजवळ, बालाजी सिनेमागृहा समोर, सेक्टर-३, कोपरखैरणे साईबाबा मंदिरा जवळ, सेक्टर-२ मोक्षनाका, कोपरखैरणे आदी परिसरात खुलेआम अमली पदार्थांची विक्री होत असल्यामुळे स्थानिक शाळकरी, कॉलेज युवक, कष्टकरी युवक मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. विक्री करणारे विक्री करतात परंतु खरेदी करणारा स्थानिक युवक ती नशा प्राशन करण्यासाठी उद्याने, बगिचे, महानगरपालिका शाळेच्या मागील परिसर, पॉवर हाऊस किंवा उघड्यावर दिवसा कोणाला न जुमानता, न घाबरता नशा करताना दिसुन येत आहेत. मात्र या साऱ्या प्रकाराकडे कोपर खैरणे पोलिसांचे पुरते दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा प्रकारे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करून कोपर खैरणे विभाग नशा मुक्त करावे अशी मागणी कोग्रेस तर्फे यावेळी करण्यात आली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

काही वर्षामध्ये पनवेल व खारघर मधील धबधब्यांवर अनेक दुर्घटना