सानपाडयात अवघ्या 10 मिनीटात दोन महिलांच्या दागिन्यांची लुट 

नवी मुंबईत चैन स्नॅचींग करणा-या लुटारुंच्या कारवाया  सुरूच

नवी मुंबई : नवी मुंबईत चैन स्नॅचींग करणा-या लुटारुंच्या कारवाया सुरूच असून या लुटारुंनी रविवारी रात्री अवघ्या 10 मिनीटामध्ये सानपाडा परिसरातील दोन महिलांच्या अंगावरील सुमारे पाऊण लाख रुपये किंमतीचे दागिने लुटून पलायन केल्याचे उघडकिस आले आहे. सानपाडा पोलिसांनी या लुटारुविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला असला तरी या लुटारुंच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत असल्याने रात्रीच्या सुमारास एकटया  दुकट्या फिरणाऱ्या महिलांमध्ये या लुटारुंची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.  

सानपाडा सेक्टर-16 मधील मोराज रेसिडेन्सी तील रुबी बिल्डींगमध्ये राहणा-या उषा मनोहर अवचट (54) या निवृत पोलिसांच्या पत्नी असून त्या दरदिवशी रात्रीचे जेवण केल्यानंतर आपली मुलगी पल्लवी अवचट (32) हिच्यासह जवळच असलेल्या गुनीना गार्डनमध्ये शतपावलीसाठी जात असतात. गत रविवारी रात्री सुद्धा त्या आपल्या मुलीसह शतपावलीसाठी गेल्या होत्या. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दोघी मायलेकी बोलत चालत आपल्या घराच्या दिशेने जात असताना, सेक्टर-15 मधील एसबीआय चौकात मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने उषा अवचट यांच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाची 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचुन पलायन केले. त्यानंतर उषा अवचट यांनी सानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.  

त्याच सुमारास सानपाडा सेक्टर-18 मधील क्युविन हेरिटेज बिल्डींगमध्ये राहणा-या अवनी पवित्रकुमार भट्टाचार्य (52) या रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातील पाळीव कुत्र्याला घेऊन बाहेर फिरण्यासाठी इमारतीच्या खाली आल्या होत्या. यावेळी त्या आपल्या इमारतीच्या गेटच्या बाहेर कुत्र्याला घेऊन उभ्या असताना, त्यांच्या जवळ आलेल्या एका लटारुने भट्टाचार्य यांच्या कुत्र्याला खेळविण्याचा बहाणा केला. त्यानंतर सदर लुटारुने संधी साधुन अवनी भट्टाचार्य यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व सोन्याची चैन जबरदस्तीने खेचले. त्यानंतर सदर लुटारुने काही अंतरावर मोटारसायकल घेऊन उभ्या असलेल्या आपल्या सहका-यासोबत मोटारसायकलवरुन मोराज सर्कलच्या दिशेने पलायन केले.  

या दोन्ही घटना अवघ्या 10 मिनीटामध्ये घडल्या असून दोन्ही घटनेतील लुटारूंचे वर्णन हे सारखेच असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे हे दोन्ही गुन्हे एकाच लुटारुंनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्हयातील दोन्ही आरोपींनी आपल्या तोंडावर मास्क लावले असल्याचे व त्यातील एका आरोपीने टोपी घातली असल्याचे आढळून आले आहे त्यानुसार सानपाडा पोलिसांनी या लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अमली पदार्थांची खुलेआम विक्री ; तरुणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात