‘शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख' पदाचा राजीनामा देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय लेटरहेडचा गैरवापर

 

माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

ठाणे ः ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ‘शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख' पदाचा राजीनामा देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय लेटरहेडचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ठाणे मधील अजय जया यांनी ठाणे महापालिका आयुवत तथा प्रशासक विपीन शर्मा यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना २५ जून २०२२ रोजी पत्र लिहून आपल्या ‘शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख' या पदाचा राजीनामा दिलेला आहे. मात्र, सदर राजीनाम्याचे पत्र पाठवताना नरेश म्हस्के यांनी आपल्या महापौर पदाच्या काळातील प्रशासकीय लेटरहेड वापरलेले आहे, जे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे ठाणे महापालिकेचे अधीकृत चिन्ह असलेले आणि ठाणे महापालिका मुख्यालयातील महापौर कार्यालयाचा स्पष्ट उल्लेख असलेले लेटरहेड आपल्या राजकीय पदाचा राजीनामा देण्यासाठी वापरणे म्हणजे महापालिका अधिनियमाचा भंग असून, यासंदर्भात ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर महापालिका अधिनियमानुसार, योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाणे मधील अजय जया यांनी ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन शर्मा यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.

दरम्यान, अशाप्रकारचे बेकायदेशीर कृत्य, इतर कोणत्याही लोकप्रतिनिधीने करु नये, यासाठी संबंधितांना योग्य ती समज देण्याचेही अजय जया यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात शेवटी नमूद केले आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां'चे नाव