सिडकोवर घेराव आंदोलन करणा-यांना पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील घेराव आंदोलन

सिडकोवर घेराव आंदोलन करणा-या अडीच हजार प्रकल्पग्रस्तांवर गुन्हा दाखल 
 
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी सिडकोवर घेराव आंदोलन करणाऱया आंदोलकांना घेराव आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील आंदोलनकर्त्यांनी घेराव आंदोलन केल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समीतीचे पदाधिकारी, आमदार माजी खासदार व या घेराव आंदोलनात सहभागी झालेल्या दोन ते अडीच हजार प्रकल्पग्रस्तांवर सीबीडी पोलिसांनी विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
  
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी  24 जुन रोजी सिडको कार्यालयाला घेराव अंदोलन करण्यात येणार असल्याने सीबीडी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे समाजकंटकाकडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात सिडकोवरील घेराव आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच सदरचे आंदोलन रद्द करण्याबाबतचे लेखी पत्र सीबीडी पोलिसांनी कृती समितीला दिले होते. मात्र त्यानंतर देखील कृती समितीने सिडको कार्यालयावर घेराव आंदोलन करणार असल्याचे जाहिर केले होते.  
 
त्यामुळे पोलिसांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱयांना कलम 149 अन्वये प्रतिबंधात्मक लेखी नोटीसा देखील दिल्या होत्या. मात्र त्यानंतर देखील शुक्रवारी दोन ते अडीच हजार आंदोलनकर्त्यांनी आग्रोळीगाव उड्डाणपुलावर स्टेज उभा करुन आंदोलन केले. तसेच विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दिलेच पाहिजे अशा घोषणा दिल्या. आंदोलनकर्त्यांनी विनापरवानगी आंदोलन करुन या आंदोलनात विनापरवानगी स्पिकर लावला. त्यामुळे सीबीडी पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेले प्रमुख नेते व पदाधिकारी व आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.  
 
गुन्हे दाखल करण्यात आलेल्यामध्ये पनवेलचे माजी खासदार रामशेठ ठाकुर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, दि.बा.पाटील  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदिप नाईक, आमदार गणेश नाईक, प्रशांत ठाकुर, मंदा म्हात्रे, भुषण पाटील, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, प्रभु चव्हाण तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समीतीचे पदाधिकारी व घेराव आंदोलनात सहभागी झालेल्या दोन ते अडीच हजार प्रकल्पग्रस्तांचा समावेश आहे.  
Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सिवुडमध्ये खाजगी विकासकाने समांतर रस्ता केला बंद ?