एपीआय अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या दिवशी एकत्रच मिरा-भाईदर मधील फ्लॅटपर्यंत गेल्याचे मोबाईल लोकेशन

नवी मुंबई : एपीआय अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या दिवशी सायंकाळी अश्विनी बिद्रे आणि बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हे दोघेही ठाणे रेल्वे स्टेशन पासुन एकत्रच मिरा-भाईदर मधील फ्लॅटपर्यंत गेल्याचे मोबाईल लोकेशन, त्यानंतर अश्विनी यांचा मृतदेह खाडीत टाकला त्यावेळेचे कुरुंदकरचे व इतर आरोपींचे लोकेशन, त्याच ठिकाणी असल्याचे गुगल लोकेशनवरुन सिद्ध झाले आहे. या गुगल लोकेशनच्या नकाशाची संगणक तज्ञांकडुन शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात खात्री करुन त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.    

अश्विनी बिंद्रे हत्याकांडाची सुनावणी गेल्या दोन वर्षांपासून पनवेल सत्र न्यायालयात न्या. माधुरी आनंद यांच्या कोर्टात सुरु होती. त्यांनी अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरेसह अनेक महत्वाचे साक्षीदार तपासले आहेत. त्यांच्या बदलीनंतर दोन महिन्यांनी शुक्रवारी दि.24 जुन रोजी न्या.के.जी पढेलवार यांच्या कोर्टात अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी सुरु झाली. या सुनावणीत डॉ. प्रशांत सुखदेवराव लोखंडे यांची अपुर्ण राहिलेली उलट तपासणी पूर्ण झाली. संगणक तज्ञ असलेले डॉ.लोखंडे हे पीएचडी धारक असून लोखंडे यांनी अश्विनीच्या लॅपटॉप मधील महत्वाचे पुरावे असललेले ऑडिओ व्हिडीओचे आलेल्या सीलबंद रिपोर्टची तसेच कुरुंदकरचे मोबाईल कोर्टाच्या आदेशानुसार चालू करुन कुरुंदकरचे लोकेशन्स आणि त्या आधारे बनविलेले नकाशे यांची कोर्टासमोर खात्री केली.  

यावरुन एपीआय अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या दिवशी सायंकाळी अश्विनी बिद्रे आणि बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हे दोघेही ठाणे रेल्वे स्टेशन पासुन एकत्रच मिरा-भाईदर मधील फ्लॅट पर्यंत गेले होते, हे मोबाईल लोकेशनवरुन सिध्द झाले. तसेच अश्विनी यांचा मृतदेह खाडीत टाकला त्यावेळेचे कुरुंदकरचे व इतर आरोपींचे लोकेशन त्याच ठिकाणी असल्याचे गुगल लोकेशनच्या नकाशाची डॉ.लोखंडे यांनी खात्री केली. अश्विनी बिद्रे यांच्या लॅपटॉप मधील ऑडीओ व्हिडीओचे रिपोर्ट हे टेक्निकल पुरावे असल्याने आरोपीच्या वकीलाना डॉ.लोखंडे यांच्या उलटत पासणीत काहीही खोडून काढता आले नाही.  

शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, अश्विनीचे पती राजू गोरे, एसीपी संगिता शिंदे-अल्फान्सो, नवी मुंबई क्राईम ब्रँचचे आधिकारी कर्मचारी, तसेच आरोपीचे वकील आणि आरोपी हजर होते. यापुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सिडकोवर घेराव आंदोलन करणा-यांना पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील घेराव आंदोलन