नवी मुंबईतील झोपड्यांचा मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर पुनर्विकास

नवी मुंबई :  नवी मुंबई शहराचा विकास झाला असला तरी एमआयडीसीच्या जागेवर २९ ठिकाणी वसलेल्या झोपडपट्ट्या अद्यापही दुर्लक्षित राहिल्या आहेत. येथील स्वार्थी नेत्यांमुळे त्यांचा विकास झाला नाही. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार या झोपडपट्ट्यांचा मुंबई आणि ठाणे शहराच्या धर्तीवर पुनर्विकास करणार आहे. झोपडपट्टीतील कुटुंबांना भक्कम पक्की घरे मिळावीत यासाठी लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अहवाल मंत्रिमंडळला सादर करणार आहे, अशी घोषणा शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिघा येथे आयोजित करण्यात आलेल्या झोपडपट्टी मेळाव्यात केली. नवी मुंबईत दिघ्यापासून ते नेरुळपर्यंत एमआयडीसीच्या ३०० एकर जागेवर झोपडपट्टी वसली आहे. सुमारे तीन लाख नागरिक २९ ठिकाणी वसलेल्या या झोपडपट्टीत वास्तव्य करतात. त्यांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या वतीने दिघा येथील नेवा भक्ती पार्कमध्ये झोपडपट्टी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला झोपडपट्टीवासीयांनी जोरदार प्रतिसाद दिला. सुमारे दहा हजार नागरिक या मेळाव्यासाठी आले. त्यामुळे दोन्ही माळ्यांवरील सभागृह गर्दीने खचाखच भरली. या मेळाव्याला संबोधित करताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबईतील झोपडीवासीयांच्या पुनर्विकासाचा प्रश्नही सोडवण्यात येणार आहे. झोपडपट्टीच्या पुनर्विकासचा एक प्रकल्प मुंबईमध्ये सुरू असून त्यामुळे एमआयडीसीला सुमारे दहा चौरस मीटरचा भुखंड उपलब्ध झाला आहे.

त्याच धरतीवर नवी मुंबईत झोपडपट्टीचा पुनर्विकास झाला तर एमआयडीसीला मोठ्या प्रमाणात भुखंड उपलब्ध होणार आहेत, अशीही माहिती सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, एम. के. मढवी, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, शिवराम पाटील, विजयानंद माने, सुरेश भिलारे, राजू पाटील, जगदिश गवते, राजेश गवते, अपर्णा गवते, दीपा गवते, आकाश मढवी, रवींद्र पाटील, राजू कांबळे, रामआशिष यादव, ममित चौगुले आदी उपस्थित होते.

शिवसेना कायम पाठीशी मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मिळावीत यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ मध्ये झोपडपट्टी सुधार कायदा
तयार केला. त्यानंतर झोपडपट्ट्यांमध्ये होणारी तोडफोड कारवाई थांबली. शिवसेना पूर्वीपासून झोपडीवासीयांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. शिवसेनाप्रमुखांमुळेच झोपडीवासीयांना सुरक्षा कवच मिळाले आहे, असेही यावेळी सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उरण नगरषदेत सदस्यांची संख्या १७ वरुन २१ वर