महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पाच बलात्काराच्या गुह्यात युकेतुन 2016 पासून फरार असलेल्या आरोपी अटक
पाच बलात्काराच्या गुह्यात युकेतुन 2016 पासून फरार असलेल्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी केली अटक
नवी मुंबई : बलात्काराच्या पाच गुह्यांमध्ये फरार असलेला व 2016 मध्ये ब्रिटनमधून पळून गेलेल्या 57 वर्षीय भारतीय व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडी येथून अटक केली आहे. पलविंदर उब्बी (57) असे या फरारी आरोपीचे नाव असून तो एका मल्टी नॅशनल कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याला इंटरपोलने फरार आरोपी म्हणून घोषीत केले होते. पलविंदर उब्बी याला अटक केल्यानंतर त्याची नवी दिल्ली येथील पटियाला हाऊस कोर्टाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पलविंदर उब्बी हा ग्रेट ब्रिटन आणि नॉर्दर्न आयर्लंड मधील एकूण पाच बलात्काराच्या गुह्यांमध्ये हवा होता. मात्र 2016 मध्ये तो ब्रिटनमधून भारतात पळून आला होता. भारत आणि यूकेमध्ये प्रत्यार्पण करार असल्याने, यूके सरकारने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला पत्रव्यवहार करुन सदर गुन्हेगाराबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आणि त्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) इंटरपोलला पत्र पाठविले होते. त्यानंतर सीबीआय-इंटरपोलने महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त महासंचालकाना यांना सतर्क केले होते.
अतिरिक्र महासंचालकाने नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखा युनिट-1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे यांना नियुक्त केले होते. गुन्हे शाखेने या आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी पलविंदर उब्बी हा नेरुळमध्ये राहत असलेल्या आपल्या आईला नियमित भेटण्यासाठी येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. मात्र, आईच्या मृत्यूनंतर पलविंदर उब्बी याने नेरुळ येथील घरी जाणे बंद केले होते. तपासादरम्यान, आरोपी पलबिंदर उब्बी हा 2019 पर्यंत वापरलेल्या मोबाईल फोनची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने उपलब्ध डेटाचा वापर करुन 2019 मध्ये वारंवार कॉल केल्या गेलेल्या नंबरची पडताळणी केली. त्यानंतर सदर नंबरचा डेटा वापरुन, मिळालेल्या काही संशयित नंबरवरुन उब्बीचा मोबाईल नंबर शोधण्यात गुन्हे शाखेला यश आले होते.
त्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक साधनांच्या मदतीने, आरोपीच्या मोबाईल नंबरची पडताळणी केल्यानंतर तो भिवंडीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला भिवंडी येथून अटक केली. त्यानंतर स्थानिक न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवुन प्रत्यार्पण कायद्याशी संबंधित प्रकरणे हाताळणाऱया नवी दिल्ली येथील पटियाला हाऊस कोर्टात आरोपी पलबिंदर उब्बी याला हजर करण्यात आले. त्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाने त्याची येत्या 25 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.