एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये कामगाराची हत्या करुन फरार झालेला आरोपी जेरबंद

नवी मुंबई : एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये काम करणाऱया शंकर पानसरे (40) याची हत्या करुन फरार झालेल्या आरोपी रवी उर्फ अरुण मोहित राघव (22) याला एपीएमसी पोलिसांनी उत्तरप्रदेश मधुन अटक केली आहे. मृत शंकर पानसरे हा रवीला नेहमी शिवीगाळ करुन त्याच्यावर दादागिरी करत होता, तसेच रवी कडुन घेतलेले उसने पैसे देखील तो त्याला परत करत नव्हता, याच वादातुन झालेल्या भांडणात रवीने शंकरच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.  

या घटनेतील मृत शंकर पानसरे हा एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये काम करुन  त्याच ठिकाणी राहात होता. तर त्याची हत्या करणारा आरोपी रवी उर्फ अरुण राघव हा  तुर्भे स्टोअर्समध्ये राहत होता. तसेच तो भाजी मार्केटमध्ये रोकडी व हमालीचे काम करत होता. त्यामुळे शंकर आणि रवी या दोघांची चांगली ओळख होती. शंकर हा सनकी स्वभावाचा असल्याने तो कुणाशीही बोलताना, शिवी देऊन त्यांच्याशी बोलत होता. शंकरने काही दिवसापुर्वी आरोपी रवी याच्याकडून उसने पैसे घेतले होते. सदरचे पैसे तो रवीला देत नव्हता, उलट तो त्याच्यावर दादागिरी करुन पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. गत रविवारी सायंकाळी शंकर आणि रवी या दोघांमध्ये उसने पैसे देण्या-घेण्यावरुन वादावादी होऊन भांडण झाले.  

या भांडणात रवीने शंकरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार हल्ला केल्याने शंकर गंभीर जखमी होऊन त्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला होता. त्यामुळे रवीने त्या ठिकाणावरुन पलायन केले होते. त्यानंतर एपीएमसी पोलिसांनी रवी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. या तपासादरम्यान आरोपी रवी हा उत्तरप्रदेश येथे पळुन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेवाळे, वसिम शेख, पोलीस उपनिरीक्षक सांगळे, पोलीस हवालदार चंद्रकांत कदम, पोलीस नाईक काळे, ठाकुर, हरड, पोलीस शिपाई भिलारे, वाटकर आदींचे दोन पथक उत्तरप्रदेश येथे रवाना करण्यात आले होते. 

 त्यानंतर या पथकाने आरोपीचा ठावठिकाणा शोधुन त्याला उत्तर प्रदेश मधील लखनौ येथील तेलीगंज जंक्शन येथून ताब्यात घेऊन त्याला नवी मुंबईत आणले. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने शंकरची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार  आरोपी रवी उर्फ अरुण राघव याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कांदा बटाटा बाजारात सुरक्षा रक्षकांकडून वाहन चालकांची लुटमार ?