नवी मुंबईतील भाजप आमदाराविरोधात महिलेची तक्रार 

नवी मुंबई : नवी मुंबईतील एका भाजप आमदाराने आपल्यासह आपल्या 15 वर्षीय मुलाला ठार मारण्याची धमकी दिली असून त्या आमदारांच्या कार्यकर्त्यांपासून आम्हा माय लेकरांच्या जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार नेरुळमध्ये राहणाऱया एका महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही नसून सदर महिलेला न्यायालयात दाद मागण्याबाबत समज दिली आहे. तसेच सदर महिलेला 24 तास पोलीस संरक्षण दिले आहे. एकुणच या सर्व प्रकरणामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

संबंधित आमदार आणि आपण 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून आपल्याला त्यांच्यापासून एक पंधरा वर्षाचा मुलगा असल्याचा खळबळजनक आरोप नेरुळ सेक्टर-16 मधील सी ब्रिज सोसायटीमध्ये राहणाऱया एका महिलेने केला आहे. आरोपीत आमदाराचे राज्यात चांगलेच वजन असल्यामुळे अनेक वर्षे आपल्याला काहीच करता आले नव्हते. परंतु, आता आपला मुलगा मोठा झाला असून त्याच्या भविष्यासाठी संबंधित आमदाराच्या इतर मुलांप्रमाणेच आपल्या मुलाला देखील त्यांच्या मालमत्तेमध्ये समान वाटा मिळावा, असा आग्रह सदर महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत धरला आहे. त्याचबरोबर त्या आमदाराने आपल्याला आणि आपल्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील तक्रारीत केला आहे. 

दरम्यान, आपण नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केल्यानंतर संबंधित आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला आणि आपल्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आमच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो म्हणून आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या महिलेने आपल्या तक्रार अर्जात केली आहे.  

नेरुळ पोलिसांनी सदर महिलेचा तक्रारी अर्ज घेतला असला तरी, त्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही, मात्र सदर महिलेला न्यायालयात दाद मागण्याबाबत समज दिली आहे. तसेच सदर महिलेने केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने या महिलेला 24 तास पोलीस संरक्षण पुरविण्यात आल्याची माहिती नेरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांनी दिली. दिवसा महिला पोलिस कॉन्स्टेबल व रात्री  पुरुष पोलिस कॉन्स्टेबल संबंधित महिलेच्या घराबाहेर तैनात करण्यात आले असल्याचे शिंदे म्हणाले.  

दरम्यान, नवी मुंबईतील भाजप आमदाराच्या बाबतीत आरोप करुन खळबळ उडवून देणाऱया महिलेला संपर्क साधला असता, या महिलेने आपण कौटुंबिक न्यायालयात दाद मागणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आरोपीत आमदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

महापेतील झाडे तोडण्यास विरोध वाढला