डॉ.आंबेडकर स्मारक आग प्रकरणी संबंधित अभियंता, ठेकेदारावर कारवाईची मागणी

 नवी मुंबई : ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला लागेल्या आगीच्या घटनेनंतर हे स्मारक पुन्हा एकदा चर्चेत आले असून सदरची आग ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे लागल्याचा आरोप आरपीआय पक्षाने केला आहे. तसेच या आगीच्या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित अभियंता, अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आरपीआयच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.  

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली येथे उभारण्यात आलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक नुकतेच सर्वांसाठी खुले करण्यात आले असले तरी या स्मारकाच्या मुख्य डोमचे काम अद्याप सुरु आहे. मागील 10 वर्षे या स्मारकाचे काम संथगतीने सुरु असल्याने डॉ.आंबेकडर यांचे स्मारक नेहमी चर्चेत राहिले आहे. मात्र चार दिवसापुर्वी या स्मारकामध्ये आगीची घटना घडल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांची भेट घेऊन आगीच्या घटनेबाबत चर्चा केली. तसेच ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सदर घटना घडल्याचा आरोप करत संबंधित अभियंता, अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.  

तसेच भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी महानगरपालिकेने विशेष काळजी घेण्याची सूचना केली. या शिष्टमंडळात आरपीआयचे नवी मुंबई पक्ष निरीक्षक बाळासाहेब मिरजे, ठाणे लोकसभा युवक अध्यक्ष यशपाल ओहोळ, नवी मुंबई महिला आघाडीच्या अध्यक्षा शीलाताई बोदडे, रमेश बोदडे, अभिमान जगताप, राकेश ओहोळ, माघाडे ताई आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड न करण्याचे तसेच संबधितावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

रस्त्यावर उभ्या गॅस वाहनांवर मनपाची कारवाई