नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे नियमित करा - -आ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई:-  नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली 250 मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व सदरबाबत शासन निर्णय आणला. परंतु नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे ‘आहे त्या स्थितीत’ सरसकट नियमित करणे, नवी मुंबईतील विस्तारित गावठाणाचे सिटी सर्व्हेक्षण पूर्ण करून त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड देणे, ग्रामस्थांना वैयक्तिकरित्या आपल्या घरांचा विकास करण्याकरिता 4 एफ.एस.आय. देणे, तसेच त्यांना रोजगारासाठी 25% कमर्शियल देणेसंदर्भात आमदार  मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे जिल्हा पालकमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांजकडे मागणी केल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी माजी महापौर सुधाकर सोनावणे, भाजपा महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रदीप गवस उपस्थित होते.

        यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली 250 मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व सदरबाबत शासन निर्णय आणला. या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु सदर शासन निर्णय करताना काही त्रुटी राहून गेल्या आहेत. नवी मुंबईतील ग्रामस्थांनी मूळ गावठाणापासून जी गरजेपोटी बांधकामे केलेली आहेत, ती सर्वच बांधकामे सरसकट नियमित करणे आवश्यक आहे. ग्रामस्थांना वैयक्तिकरित्या आपल्या घरांचा विकास करण्याकरिता 4 एफ.एस.आय. दिल्यास सोयीचे होईल. तसेच ग्रामस्थांनी कमर्शियल बांधकामे केलेली असताना त्यांना रोजगारासाठी 25 % कमर्शियल देखील देणे गरजेचे आहे. याकरिता ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे ही विशिष्ट दर लावून नियमित करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 2015 पर्यंतची सर्व घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. मी 2004 पासून सातत्याने लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याच्या मुद्द्याद्वारे सदर प्रश्न विधानमंडळ सभागृहात घेत आहे, त्याबाबत सततच्या बैठका व पाठपुरावा करीत आहे. शासनाने आतापर्यंतची सर्वच घरे सरसकट नियमित करण्याची आवश्यकता असल्याने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांजकडे सदर बाबत मागणी केली आहे. विस्तारित गावठाणातील घरांचे सिटी सर्वेक्षण केल्यास त्यांना त्यांच्या घरांचे मालकी हक्क म्हणून प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत मी गेले अनेक वर्षे लढा देत आहे.

 मूळ गावठाणचे प्रॉपर्टी कार्ड वाटप केले आहेत. परंतु विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षण केल्यास ग्रामस्थांची सर्व घरे ही अधिकृतरित्या मालकी हक्काची होणार आहेत. नवी मुंबईतील विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षण बेलापूर गावातून सुरु करण्यात आले होते तसेच दिवाळे, सारसोळे व सानपाडा गावातील सिटी सर्वेक्षण सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेले आहेत. सदर प्रश्न मार्गी लागल्यास ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. हा मुद्दा येणाऱ्या अधिवेशनात घेण्यात येणार असल्याचेही आ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे लवकरच नियमित