ओला टॅक्सीत विसरलेल्या दागिन्यांच्या बॅगेचा पोलिसांनी लावला काही तासात छडा

 नवी मुंबई : ओला टॅक्सीमध्ये राहिलेली तब्बल साडे चार लाख रुपये किंमतीचे दागिने, कपडे व व इतर महत्वाच्या वस्तुंची बॅग, वाशी पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधुन काढत बॅग मालकाला परत दिली आहे. वाशी पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून दागिने असलेल्या बॅगेचा तत्काळ शोध घेतल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.  

ठाण्यातील किसन नगर भागात राहणारा आकाश कुमार मौर्या (25) या तरुणाचे काही दिवसापुर्वीच लग्न झाल्याने तो पत्नी व नातेवाईकांसोबत गत 15 फेब्रुवारी रोजी ठाण्यातुन ओला टॅक्सीने वाशी येथे नातेवाईकांकडे आला होता. मात्र ओला टॅक्सीतून उतरताना तो 4 लाख 50 हजार रुपये किंमतीचे दागिने, कपडे व इतर महत्वाच्या वस्तु असलेली बॅग ओला टॅक्सीतून काढण्यासाठी विसरुन गेला होता. मात्र काही वेळानंतर आपली बॅग ओला टॅक्सीत राहिल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने ओला टॅक्सी चालकाच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याचा मोबाईल फोन बंद असल्याचे आढळुन आले.  

त्यामुळे आकाशने तत्काळ वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक वने पोलीस हवालदार अशोक कचरे, पाटील यांनी ओला टॅक्सीच्या नंबरवरुन पाठपुरावा करुन शोध घेतला असता, ओला टॅक्सी चालक हा कळंबोली येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कळंबोली येथे जाऊन ओला चालकाकडे असलेली दागिने व इतर वस्तु असलेली बॅग ताब्यात घेऊन ती मुळ मालक असलेल्या आकाश मौर्या याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केली. वाशी पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवुन अवघ्या काही तासात ओला चालकाचा शोध घेऊन दागिने असलेली बॅग परत मिळवुन दिल्याने मौर्या कुटुंबियांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले आहेत.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अनधिकृत झोपड्यांवरील कारवाई ठरली औक घटकेची