बेलापूर जेट्टी येथे वॉटर टॅक्सी जलवाहतुकीस आजपासून सुरुवात

नवी मुंबई: बेलापूर जेट्टी येथील बहूप्रतिक्षित वॉटर टॅक्सी आज 17 फेब्रुवारी पासून नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. राज्याचे  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व केंद्रीय बंदर आणि जलवाहतूकमंत्री सरबानंद सोनोवाल यांच्या शुभ हस्ते वॉटर टॅक्सीचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे  आमदार मंदा म्हात्रे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांनी राबविलेल्या जेट्टी व्हिजनचे सर्व नवी मुंबईतून कौतुक केले जात आहे. 

त्याअनुषंगाने 16  फेब्रुवारी रोजी आ. मंदा म्हात्रे यांनी सदर जेट्टीचा पाहणी दौरा केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपा प्रभारी संजय उपाध्याय, महामंत्री डॉ.राजेश पाटील, विजय घाटे, दत्ता घंगाळे, श्रीराम घाटे, बाळकृष्ण बंदरे, रविंद्र म्हात्रे तसेच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपअभियंता प्रवीण पाटील, प्रशांत सानप उपस्थित होते. सदर जेट्टीमुळे वॉटर टॅक्सी नागरिकांच्या सेवेत दाखल होत असल्याने कमी वेळात कमी पैशात सर्व सुविधा प्राप्त होणार असून स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे.

यावेळी आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, 2004 पासून मी जेट्टी व्हिजन राबवित असून नवी मुंबईतील गावागावांत 8 जेट्टी तयार केल्या आहेत. बेलापूर जेट्टी निर्माण करण्याकरिता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून सर्वप्रथम 8.5 कोटी रुपये मंजूर करून 5 जानेवारी 2020 रोजी या जेट्टीचे भूमिपूजन करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये काम संथ गतीने सुरू असताना तदनंतर अजून 4 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करून घेतला. सदर जेट्टी उभारण्यासाठी  सुमारे 15 कोटींचा खर्च झाला असून सदर ठिकाणी उद्यान व फुडप्लाझा तयार होणार आहे. बेलापूर जेट्टीचे लोकार्पण होत असल्याने 200-250 स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळणार आहे. जेट्टीपर्यंत येण्या-जाण्याकरिता 4 इलेक्ट्रिक बसची व्यवस्था करण्यात आली असून शेकडो टॅक्सी-रिक्षा यांची आवश्यकता भासणार आहे. 

नवी मुंबई परीसरात सामान्य नागरिकांची लक्षणीय संख्या पाहता वॉटर टॅक्सीचा प्रवासी दर कमीत कमी असावा अशी मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असल्याने संपूर्ण जगातील नागरिक एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून या बेलापूर जेट्टीचा उल्लेख करतील. तसेच माझ्या बेलापूर विधानसभा क्षेत्रात अनेक विकासकामे मार्गी लागत असताना पर्यटनाला चालना मिळाल्याने नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. जलवाहतूक सुरू झाल्याने रस्त्यांवरील गाड्यांचा ताण कमी होऊन प्रदूषणालाही आळा बसणार आहे. या प्रवासी जेट्टीमुळे नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, उरण, पनवेल अशा आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही फायदा होणार आहे. ज्या प्रकारे पर्यटकांकरिता मुंबई दर्शन करण्यासाठी प्रवासी बस आहे, त्याच धर्तीवर नवी मुंबई दर्शन करण्यासाठीही नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रवासी बस उपलब्ध करण्याची मागणी पालिका आयुक्त यांना करण्यात येणार असल्याचे आ.मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

अमित ठाकरेंच्या हस्ते नवी मुंबईत ३ मनसे शाखांचे उद्घाटन