अनधिकृत होर्डिंग्ज ‘मेट्रो रेल्वे’ला धोका; नागरिकांमध्ये नाराजी 

खारघर ः शीघ्र कृती दल समोरील सिग्नल आणि भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वार समोर काही दादा मंडळीकडून लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग्ज मेट्रो रेल्वे मार्गावर असल्यामुळे ‘मेट्रो रेल्वे’ला अडचणीचे ठरत असून, पनवेल महापालिका प्रशासनाने सदर होर्डिंग्ज तात्काळ हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

तळोजा वसाहतीत मोठ्या प्रमाणात खाजगी बिल्डरांचे इमारत बांधकाम प्रकल्प सुरु आहेत. घराच्या जाहिरातीसाठी काही दादा मंडळी शीघ्र कृती दल, तळोजा वसाहत भुयारी मार्ग आणि फेज दोन पेंधर मेट्रो स्थानक लगत नदी समोरील रस्त्यावर काही दादा मंडळींकडून लोखंडी होर्डिंग्ज उभारले असून, त्यावर परिसरात सुरु असलेल्या काही बिल्डरांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिराती झळकत आहेत. काही दादा मंडळीने सदर अनधिकृत होर्डिंग्ज उभारुन परस्पर होर्डिंग्जवर लावण्यात येणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांकडून मोठ्या रक्कम गोळा करीत असल्याचे सांगितले जाते. विशेषतः मेट्रो रेल्वे मार्गालगत लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमुळे मेट्रो रेल्वे चालकाचे लक्ष विचलित होवू शकते. सदर अनधिकृत होर्डिंग्जवर पनवेल महापालिका आणि सिडकोकाडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, मेट्रो रेल्वे मार्गात जाहिरात लावणे योग्य नसून, या विषयी पोलीस प्रशासनाकडे पोलीस बंदोबस्तची मागणी करुन लवकरच सदर अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली जाणार आहे, असे पनवेल महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ओला टॅक्सीत विसरलेल्या दागिन्यांच्या बॅगेचा पोलिसांनी लावला काही तासात छडा