कर्नाळा बँक प्रकरणात पुन्हा ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार

पनवेल ः केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने बँकेतील ठेवींवरील विम्याबाबत  घेतलेल्या  निर्णयामुळे आता ‘कर्नाळा नागरी बँक’च्या ठेवीदारांना एक लाखांऐवजी थेट पाच लाख रुपयांची विमा भरपाई मिळणार असल्याचे जाहिर झाल्यानंतर ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’, या धर्तीवर ‘आमच्याच प्रयत्नाने हे झाले’, अशी आवई उठवायला काही स्वयंघोषित समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींनी सुरुवात केली आहे.

‘कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती’चे अध्यक्ष आमदार महेश बालदी आणि कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्राने सदर निर्णय घतला. कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाला सर्वप्रथम आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाचा फोडली. (या काळात तर ‘कर्नाळा बँक ठणठणीत, विकेल पाटील यांची प्रकृती उत्तम’, अशा आशयाचे वृत्त स्वयंघोषित समाजसेवकाने प्रसिध्द केले होते) आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ‘कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती’च्या माध्यमातून मागणी, मोर्चे, आंदोलन, पाठपुरावा या सर्व लढाई लढल्यानंतर सदर यश ठेवीदारांच्या पदरात पडले आहे.

मात्र, आता स्वयंघोषित समाजसेवक आणि एका लोकप्रतिनिधीने उसने अवसान आणून ‘हे आम्हीच केले’, असा आव आणून छाती बडवायला सुरुवात केली आहे. कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे माजी आमदार विवेक पाटील यांनी बुडविल्यानंतरही ‘शेकाप’ने कधीही ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे काढले नाहीत, आंदोलन केले नाही आणि साधी मागणीही केली नाही. 

पूर्वी एक लाख रुपयांच्या ठेवींना विमा संरक्षण होते. मात्र, दूरदृष्टी असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संरक्षण रक्कम पाच लाखांनी वाढवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. त्यामुळे सदर निर्णय भाजप सरकारने ठेवीदारांच्या हितासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. ठेवीदारांना पैसे मिळोत न मिळो फक्त आणि फक्त विवेक पाटील घोटाळ्यातून बाहेर पडावेत यासाठी ‘शेकाप’ने प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, आता त्याचे श्रेय घेण्यासाठी शेकाप नेत्यांची केविलवाणी धडपड सुरु आहे. वास्तविक केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ठेवीदारांना विम्याच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत, याचा सोयीने विसर शेकाप नेत्यांना पडला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.

‘होय मीच पैसे घतले’, असे छातीठोकपणे सांगणारे विवेक पाटील यांच्याकडे गडगंज मालमत्ता असताना ती विकून गोरगरिब ठेवीदारांचे पैसे ‘शेकाप’ नेत्यांनी का मिळवून दिले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो. आयत्या बिळावरचे नागोबा असलेले शेकाप पुढारी तेव्हा गप्प का राहिले. जर लोकांचे पैसे तेव्हाच दिले असते तर विवेक पाटील यांना जेलची हवा खावी लागली नसती. पैसे बुडल्याचे समजल्यावर, ठेवीदारांचे स्वप्नातील घर स्वप्नातच राहिले, अनेकांची लग्न झाली नाहीत, अनेकांचे वैद्यकीय उपचार झाले नाहीत आणि त्यातून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, त्यावेळी विवेक पाटील यांच्या आणि शेकाप नेत्यांच्या डोळ्यात एकही अश्रू आला नसेल. विवेक पाटील कधी बाहेर येतात याची शेकाप नेत्यांना उत्सुकता लागली असेल. पण, लोकांची करोडाेंची मालमत्ता हडप करुन विवेक पाटील उजळ माथ्याने फिरु शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

बेलापूर जेट्टी येथे वॉटर टॅक्सी जलवाहतुकीस आजपासून सुरुवात